'गेम चेंजर' पाहायला जाताय? त्याआधी वाचा चित्रपटाचा Audience रिव्ह्यू

एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर कित्येक नेटकऱ्यांनी एक्सवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Updated: Jan 10, 2025, 12:21 PM IST
'गेम चेंजर' पाहायला जाताय? त्याआधी वाचा चित्रपटाचा Audience रिव्ह्यू title=

Game Changer Review: नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येणारा 'गेम चेंजर' हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि आता हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. एस. शंकरच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचा रन टाइम हा 2 तास 44 मिनिटे इतका असून, 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम चरणच्या 'विनय विद्या रामा' या चित्रपटानंतर राम चरणचा हा दुसरा वैयक्तिक मुख्य भूमिकेतील चित्रपट आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर तर 'गेम चेंजर'च्याच चर्चा सुरू आहेत. 

'गेम चेंजर'च्या सोशल मिडीयावरील चर्चेत या चित्रपटाचे रिव्ह्यू सुद्धा येण्यास सुरुवात झाली आहे. या चित्रपटातून राम चरण हा तीन वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. राम चरण चित्रपटात वडील आणि मुलगा या दोन्ही भूमिका साकारताना दिसत आहे. राम चरणने याआधी 'आरआरआर' या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 'आरआरआर' या चित्रपटाने जगभरात एक हजार कोटींहून अधिक कमाई केली होती. आता त्यांचा 'गेम चेंजर' हा चित्रपटसुद्धा तितकंच यश मिळवू शकेल का? हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरेल. 

 

'गेम चेंजर'चे ट्विटर रिव्ह्यू

या चित्रपटावरुन नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 'गेम चेंजर' हा संक्रांतीसाठी परफेक्ट चित्रपट असल्याचं एका नेटकऱ्याने सांगितलं आहे. या चित्रपटात बरेच चढ-उतार, आकर्षक आणि मजेशीर सीन्स असल्याचं दुसऱ्या नेटकऱ्याने सांगितलं आहे. राम चरणची पोलीस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत तर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे आहे. कियारा अडवाणी आणि एस. जे. सूर्याने साकारलेल्या भूमिकासुद्धा पुन्हा पुन्हा बघण्यासारख्या आहेत. 

आणखी एका नेटकऱ्याने असे लिहिले आहे की, "चित्रपटाचा दुसरा भाग 20 मिनिटांच्या फ्लॅशबॅक नंतर सुरु होतो आणि हा भाग अप्रतिम तसेच रोमांचक आहे." एका नेटकऱ्याने तर चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत खूप चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. कित्येक नेटकरी तर चित्रपटगृहातील व्हिडीओ शेअर करत चित्रपटगृह प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असून चाहते आतापासूनच जल्लोष करत असल्याचं सांगत आहेत. 

 

चित्रपटाकडून वाढल्या सर्वांच्या अपेक्षा

चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांना 'गेम चेंजर' या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'इंडियन 2' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. आता 'गेम चेंजर'ला घेऊन सर्वांनाच अपेक्षा आहेत. एस. शंकर यांनी पहिल्यांदाच या तेलुगू भाषेतील  चित्रपटाचे दिग्दर्शन केले आसून हा चित्रपट हिंदी आणि तमीळ भाषेत प्रदर्शित केला गेला आहे. चित्रपटात राम चरण आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेतच, या व्यतिरिक्त अंजली, समुथिरकानी, एस. जे. सूर्या, श्रीकांत, सुनील आणि जयराम सुद्धा या चित्रपटात झळकत आहेत.