हिंदी इंडस्ट्रीतही मराठमोळ्या प्रसाद खांडेकरचीच हवा; प्रसिद्धी पाहून दिग्दर्शकही हैराण, 'तो' प्रसंग एकदा ऐकाच

Maharashtrachi Hasyajatra Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत याची कल्पना आपल्याला आहे. पण त्या कलाकारांचे बॉलिवूड चाहत्यांची यादी ही संपेनाशी झाली आहे. एकदा पाहा प्रसाद खांडेकरला वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, आलेला अनुभव...

दिक्षा पाटील | Updated: Sep 25, 2023, 01:27 PM IST
हिंदी इंडस्ट्रीतही मराठमोळ्या प्रसाद खांडेकरचीच हवा; प्रसिद्धी पाहून दिग्दर्शकही हैराण, 'तो' प्रसंग एकदा ऐकाच title=
(Photo Credit : Social Media)

Maharashtrachi Hasyajatra Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रम अनेक लोक रोज पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अर्थात कार्यक्रमातील कॉमेडीचा जो तडका आहे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या कार्यक्रमातील कलाकारांनी फक्त प्रेक्षकांची नाही तर सेलिब्रिटींची देखील मने जिंकली आहेत. या कार्यक्रमातील वेग पुरकर आणि कोहली फॅमिली म्हणून प्रेक्षकांच्या मनात छाप सोडणारा अभिनेता प्रसाद खांडेकरचे लाखो चाहते आहेत.  त्या यादीत फक्त बिग बी आणि जॉनी लिव्हर नाही तर अनेक सेलिब्रिटी आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसाद खांडेकरनं राजीव खंडेलवाल यांच्यासोबत आलेल्या एका अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

प्रसाद खांडेकरनं त्याचा आगामी चित्रपट एकदा येऊन तर बघा या चित्रपटाच्या निमित्तानं झी24 तासला मुलाखत दिली होती. यावेळी प्रसादसोबत नम्रता संभेराव आणि रोहित मानेनं देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की बिग बींपासून जॉनी लिव्हर पर्यंत अनेकांनी तुमचं कौतुक केलं... असं कधी झालं का की तुम्ही कोणती कमेंट ऐकूण भारावलात का? त्यावर उत्तर देत प्रसादनं त्याला आलेला अनुभव सांगितला आहे. प्रसाद खांडेकर त्याला आलेला अनुभव सांगत म्हणाला, 'मी 'मिया-बीवी और मर्डर' या नावाची वेब सीरिज केली. राजीव खंडेलवाल, मंजीरी फडणवीस अशी सगळी हिंदीतले कलाकार होते. माझी भूमिका खूप छान होती. वेब सीरिजच्या शूटिंगचा अगदी पहिला दिवस आणि मी पहिल्यांदा सेटवर गेलो. तेव्हा कळलं की माझा पहिलाच सीन हा राजीवसोबत आहे. माझी कोणाशीच काही ओळख नव्हती. रमेश सिंग हा त्याचा जो असोसीएट दिग्दर्शक होता. त्यांच्यासोबत माझी निलेश दिवेकरमुळे थोडी ओळख होती.'

दिग्दर्शक का हैराण झाले यााविषयी सांगत प्रसाद म्हणाला, 'पहिलाच दिवस आणि माझं नाईट शूट होतं. त्यावेळी राजीव खंडेलवाल सरांना मी म्हटलं हॅलो सर, ‘माय सेल्फ प्रसाद, मैं सावंत का किरदार निभा रहा हूं|’ तर ते लगेच म्हणाले - ‘अरे भाई तू क्यों पहचान दे रहा है यार, सब पहचानते है आपको! यार मेरे घर में आपका हास्यजत्रा ही चलता रहता है।’ मग त्यांनी मला काही भूमिकांची नावं सांगितली. तर मला खूप भारी वाटलं. त्यांच्याशी बोलत असतानाच मंजीर मेकअप रुममधून आली आणि म्हणाली, 'अरे प्रसाद मी तुमची खूप मोठी फॅन आहे.' तुमचे सगळे शो बघते. काय स्कीट करता तुम्ही, ती बोलायला लागली आणि त्यानंतर आमचे एक डीओपी जे कॅथलिक होते, ते कॅमेऱ्याच्या मागून बोलले- ‘सर मैं आपका फैन हूं, मेरी बीवी घरपर वो ही देखती है।’ मग स्पॉट बॉय बोलला आणि अचानक सेटवर सगळेच बोलायला लागले की मी पण फॅन आहे, मी पण फॅन आहे.'

पुढे दिग्दर्शकाविषयी सांगत प्रसाद खांडेकर म्हणाला, 'हे सगळं पाहून दिग्दर्शकाचं असं झालं की अरे मी कोणाला घेऊन आलोय... हा कोण आहे. सगळेच याचा कार्यक्रम पाहतात. तो माझ्यासाठी पहिल्या दिवशीचा खूप छान अनुभव होता.'

दरम्यान, प्रसाद, नम्रता आणि रोहित हे त्यांचा आगामी चित्रपट एकदा येऊन तर बघा या चित्रपटाच्या निमित्तानं आले होते. त्यांचा हा आगामी चित्रपट हा 24 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.