Omar Lulu on Rape Allegiance: अभिनेत्रीने दिग्दर्शकांवर कास्टिंग काऊच किंवा बलात्काराचे आरोप लावण्याच्या अनेक घटना सिनेसृष्टीतून समोर येत असतात. अशाच एका घटनेची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. मल्याळम सिने दिग्दर्शक उमर लुलूच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्याच्यावर एका अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केलाय. उमर लुलु हा 2019 मध्ये आलेला रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा 'ओरु अदार लव्ह' साठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या विरोधात केरळ पोलिसांनी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केलाय. एका तरुण अभिनेत्रीच्या प्राथमिक तक्रारीनंतर उमर लुलु याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांनी याबद्दल माहिती दिली.
पीडित अभिनेत्रीने कोची शहर पोलीस आयुक्तांकडे यांसदर्भात तक्रार केली. यानंतर कथित आरोपी दिग्दर्शक उमर लुलूच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली. यानंतर हे प्रकरण नेदुम्बसेरी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले. कारण या हद्दीत हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान इंडियन पिनल कोर्ट म्हणजेच आयपीसी कलम 376 अंतर्गत लुलूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमर लुलू हा सिने दिग्दर्शक असून 2016 मध्ये त्याचा 'हॅपी वेडिंग' हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. यानंतर 2017 मध्ये त्याचा 'चंक्झ' सिनेमा चर्चेत आला. या सिनेमात अश्लील चित्रिकरणाचा सर्रास वापर करण्यात आल्याचे म्हटले गेले. दरम्यान बी ग्रेड सीन्स, स्त्रियांच्या वस्तुनिष्ठ आणि लैंगिकीकरणासाठी उमर लुलू कुप्रसिद्ध आहे.
ओमर लुलू कायदेशीर अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, 'नाडा समद' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एमडीएमएचा वापर केल्याचे फुटेज समोर आले होते. यानंतर कोझिकोड एक्साइज रेंजनेही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ओमर लुलूने आपल्या करिअरमध्ये 'हॅपी वेडिंग', 'चंक्स', 'ओरू अदार लव्ह', 'धमाका' आणि 'गुड टाइम' सारखे चित्रपट केले आहेत. लुलू रिॲलिटी शो 'बिग बॉस मल्याळम सीझन 5' मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणूनही दिसला होता.
अभिनेत्रीने केलेल्या बलात्काराच्या आरोपावर लुलूने उत्तर दिले आहे. माझी त्या मुलीशी खूप दिवसांपासून मैत्री होती. ती माझ्यासोबत अनेक दौऱ्यात असायची. मात्र आमच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही संपर्कात नाही, असे लुलू याने पोलिसांना सांगितले.
आता मी माझा नवीन चित्रपट सुरू केल्यावर ती अशी तक्रार घेऊन आली आहे. यामागचे कारण चित्रपटात संधी न दिल्याचा राग असू शकतो, असे दिग्दर्शकाने सांगितले. किंवा पैसे उकळण्याच्या ब्लॅकमेलच्या प्रयत्नाचा भाग असू शकतो, असेही दिग्दर्शकाने पुढे म्हटले आहे.