मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत 'वंदे भारतम' या सेल्फ-स्टारर चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण करणार होता, अशी माहिती समोर येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशांत सिंह राजपूतचा मित्र संदीप सिंह करणार होता. संदीप सिंहला 'अलीगढ़', 'सरबजीत' आणि 'भूमि' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केल्याचं श्रेय आहे.
संदीपने इन्स्टाग्रामवर शनिवारी सायंकाळी सुशांतच्या आगामी चित्रपटाबाबत माहिती देत, चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं आहे. संदीपने सुशांतचा फोटो असलेलं एक पोस्टर शेअर करत लिहिलंय की, 'तु मला वचन दिलं होतं की आपण दोघे मिळून इंडस्ट्रीत नाव मिळवू आणि तुझ्या-माझ्यासारखी स्वप्न बघणाऱ्या तरुणांना प्रोत्साहित करुन, अशा तरुणांसाठी आपण सपोर्ट सिस्टम बनू...तु मला वचन दिलं होतं की, तुझ्यासोबत माझी दिग्दर्शक म्हणून सुरुवात होईल आणि आपण एकत्र या चित्रपटाची निर्मिती करु. तुझ्या जाण्याने मी तुटलो आहे, आता मी हे आपलं स्वप्न कसं पूर्ण करु' अशी भावनिक सादही त्याने आपल्या मित्राला घातली आहे.
'पण मी हा चित्रपट पूर्ण करणार आणि हा चित्रपट सुशांतला श्रद्धांजली असेल, ज्याने लाखो लोकांना प्रेरित करत काहीही अशक्य नाही नसल्याची उमेद जागवली आहे', आपल्या खास मित्राच्या आठवणीत संदीपने आपल्या भावनांना वाट मोकळी करत भावूक पोस्ट केली आहे.
14 जून रोजी सुशांतने त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. यावर ईलाजही सुरु होते. मात्र सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत कोणतेही ठोस पुरावे पोलिसांना आढळले नाहीत. नैराश्यातून सुशांतने हे पाऊल उचललं असल्याचं सध्या पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून याबाबत कसून चौकशी सुरु आहे.