दाक्षिणात्य सुपरस्टार विजयने तामिळनाडूत आपला राजकीय पक्ष लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयची पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाची नोंदणी केली जाणार असून त्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत 200 सदस्यांनी हजेरी लावली. पक्षाचे सरचिटणीस आणि खजिनदार यांचीही नियुक्ती करण्यात आली असून केंद्रीय कार्यकारिणीही स्थापन करण्यात आली आहे. परिषदेने विजयला पक्षाचे नाव आणि नोंदणीबाबत निर्णय घेण्याचे आणि निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे अधिकार दिले आहेत.
विजय राजकारणात नेमका कधी उतरणार याबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "2026 मध्ये तामिळनाडूमधील निवडणुकांपूर्वी राजकारणात प्रवेश केला जाईल. तामिळ सिनेमात रजनीकांत यांच्यानंतर विजयकडे पाहिलं जातं. त्याने 68 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्याची राजकारणात उतरण्याची इच्छा आहे.
अन्नाचे मोफत वाटप, शैक्षणिक शिष्यवृत्ती, ग्रंथालय, संध्याकाळची शिकवणी आणि अगदी कायदेशीर मदत यासह अनेक धर्मादाय आणि कल्याणकारी उपायांमध्ये तो त्याच्या फॅन क्लबचा समावेश करत आहे. नुकतंच त्याने सार्वजनिक परीक्षांमध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार करण्यासाठी मतदारसंघानुसार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. "आंबेडकर, पेरियार, कामराज यांसारख्या नेत्यांबद्दल वाचा. जे चांगले आहे ते घ्या आणि बाकीचे सोडून द्या," असा सल्ला त्याने दिला होता.
विजयचे वडील चंद्रशेखर हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. विजय आपल्या चित्रपटांमधून संवेदनशील आणि लोकहिताच्या विषयांना हात लावत असतो. विजयच्या अनेक चित्रपटांमध्ये थेट सरकारला आव्हान देण्यात आलं होतं.