मुंबई : हिंदी चित्रपटांमध्ये जितकं प्रेम मुख्य भूमिकेत असणार्या नायक- नायिकांना मिळतं, तितकंच किंबहुना त्याहून जास्त प्रेम आणि लोकप्रियता ही चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही मिळाली. त्यातीलच एक नाव म्हणजे डॅनी डँग्झोपा. डॅनी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या वर्तुळातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
प्रभावी व्यक्तीमत्त्वं असणाऱ्या या अभिनेत्याला भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजु होण्यात रस होता. सिक्कीममध्ये जन्मलेल्या या अभिनेत्याचं खरं नाव आहे Thsering Phintso Denzongpa. त्यांना बालपणापासूनच घोड्यांची आवड होती. पुढे जाऊन त्यांना सैन्यदलाप्रती कमालीचं आकर्षण वाटू लागलं. पण, भारत- चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आईने त्यांना सैन्यदला भरती होऊ दिलं नाही.
पुढे त्यांनी पुण्यातील एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांच्या नावाची बरीच खिल्ली उडवली जात असे. तेव्हाच त्यांची वर्गमैत्रीण म्हणजेच जया भादुरी (जया बच्चन) यांनी त्यांना डॅनी हे नाव देऊ केलं. पुढे जाऊन ते याच नावाने ओळखले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळात डॅनी यांचं हिंदी भाषेशी फारसं चांगलं समीकरण नव्हतं. मुळचे उत्तर पूर्व भारतातील असणाऱ्या डॅनी यांनी यावरही उपाय शोधला. तासनतास ते खळखळणाऱ्या समुद्राशी गप्पा मारत असत. याच तंत्राने त्यांनी हिंदी भाषेवर चांगली पकड मिळवली.
कलाविश्वात भूमिका मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास फारसा सोपा नव्हता. सुरुवातीचा काळ ते जणू एका नव्या ग्रहावरच वावरत असल्यासारखे राहिले. पण, त्यांच्या वाट्याला ज्या भूमिका मिळाल्या त्या निभावत त्यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
'अग्निपथ', 'हम', 'अंदर बाहर', 'चुनौती', 'क्रांतीवीर', 'अंधा कानून', 'घातक' आणि 'इंडियन या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षक आजही विसरु शकलेले नाहीत. अभिनय क्षेत्रासमवेत डॅनी हे पर्यावरणस्नेही उपक्रमांमध्येही कायमच हिरीरिने सहभागी होत असतात. याव्यतिरिक्त ते गायन, चित्रकला यांसारख्या कलांमध्येही पारंगत आहेत.