मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. बॉलीवूडचा ट्रॅजेडी किंग म्हटल्या जाणाऱ्या दिलीप यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या दुख:मध्ये सामील झालं. सगळ्या बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याच अनुक्रमात तारक मेहता का उल्टा चश्माचे अभिनेते घनश्याम नायक यांनाही दिलीप यांची आठवण काढली आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्म'मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक 77 वर्षांचे असून त्यांनी 250 हून अधिक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे. घनश्याम नायक एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, 'दिलीप कुमार यांच्या निधनाच्या बातमीने मला फार वाईट वाटलं. ते एक सुंदर स्वभाव असलेली व्यक्ती होते. मला एकदा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान मानतो.
दिलीप कुमार यांच्या बंगल्यात शूटिंग
घनश्याम नायक यांनी सांगितलं की, ''बऱ्याच वर्षापूर्वी दिलीप साहेबांनी एक टीव्ही शो तयार केला होता ज्याचं नाव 'जरा देखो इनका कमाल' असं होतं. या शोमध्ये त्यांनी एका नोकराची भूमिका होती. यासाठी लेखकाने त्यांना माझं नाव सुचवलं. दिलीप साहेबांच्या बंगल्यावर शूटिंग होणार होतं आणि मी तिथे पोचलो तेव्हा त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, ये घनश्याम.''
घनश्याम नायक दिलीप कुमार यांच्या वागण्याने खूप प्रभावित झाले. एवढ्या मोठ्या कलाकाराने त्यांचं असं स्वागत केलं म्हणून ते खूप खुश झाले. ते म्हणाले की, दिलीप साहेबांनी मला पहिल्याच भेटीत स्वत:चं बनवलं होतं. त्यांनी बागेत फिरत-फिरत मला संपूर्ण सीन समजावून सांगितला आणि ते पुढे म्हणाले, तुला एक्टिंग नाही करायची आहे एकदम नॅच्युरल रहायचं आहे. आणि मग मला बंगल्याच्या आत नेलं. सीन पूर्ण झाल्यानंतर दिलीप साहेब म्हणाले की, तुमचा चेक तयार आहे पण तुम्ही आमच्याबरोबर जेवण केल्याशिवाय जाऊ शकत नाही. घनश्याम म्हणाले की, इतका मोठा सुपरस्टार असूनही त्यांची वागणूक अतिशय सभ्य होती.