मुंबई : झुरळ हा निरूपद्रवी कीटक आहे. मात्र त्याला पाहून अनेकजणांची भंबेरी उडते, काहींना झुरळ किळसवाणा वाटतो. मात्र स्वयंपाकघरात झुरळांचा वावर असणं म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण असते. प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस झुरळांचा वावर अधिक असतो त्यामुळे आपल्या नकळत नेमके कुठे झुरळ फिरते हे आपल्याला ठाऊक नसते. अनेक घरात झुरळांचा वावर टाळण्यासाठी केमिकलयुक्त कीटकनाशकं फवारली जातात. मात्र केमिकल्स धोकादायक असल्याने त्यामुळे अॅलर्जी, श्वसनाचे त्रास जडण्याचा धोका अधिक असतो.
झुरळांना हटवण्यासाठी केमिकलयुक्त पदार्थ वापरण्याऐवजी स्वयंपाकघरातील तमालपत्र हा मसाल्याचा पदार्थ फायदेशीर ठरतो. तमालपत्रामुळे जशी पदार्थांना चव येते तसाच त्याचा वापर घरातील झुरळांना लांब ठेवण्यासाठीदेखील केला जातो.
झुरळांना लांब ठेवण्यासाठी तमालपत्र वापरणार असाल तर त्याची अगदी बारिक पूड करा. तमालपत्राची पूड स्वयंपाकघरात पसरवून ठेवा.
रात्रीच्या वेळेस घरात तमालपत्राची पानं जाळा. त्याच्या मंद गंध घरात आणि प्रामुख्याने स्वयंपाकघरात दरवळू द्यावा. यामुळे झुरळांना दूर ठेवण्यास मदत होते. घरात तमालपत्र जाळण्याचे हे आहेत भरपूर फायदे
अनेक घरांमध्ये साखर आणि बेकिंग सोडा हे मिश्रण स्वयंपाकघरात ठेवले जाते. या मिश्रणामुळे झुरळांना दूर ठेवण्यासाठी मदत होते. साखरेकडे झुरळ आकर्षले जातात, परंतू हे मिश्रण झुरळांसाठी विषारी ठरतं.