ही साधी मेडिकल डिव्हाईस तुमचा पुढचा मोठा खर्च, धोका दूर ठेवतील, म्हणून कायम घरी ठेवा

अनेक महत्त्वाचे डिव्हाईस आहेत जे तुमच्या घरी असणं फार गरजेचं आहे.

Updated: Jun 9, 2021, 09:11 PM IST
ही साधी मेडिकल डिव्हाईस तुमचा पुढचा मोठा खर्च, धोका दूर ठेवतील, म्हणून कायम घरी ठेवा title=

मुंबई : भारत सध्या कोरोनासारख्या गंभीर महामारीशी लढतोय. कोरोनाच्या काळात ऑक्सिमीटर या मेडिकल डिव्हाईसमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळाले तर काहींचा जीव देखील वाचण्यास मदत झाली. ऑक्सिमीटर प्रमाणे असे अनेक महत्त्वाचे डिव्हाईस आहेत जे तुमच्या घरी असणं फार गरजेचं आहे.

थर्मामीटर

कोरोना असो किंवा डेंग्यू असो आरोग्याच्या समस्यांमध्ये अनेकदा शरीराचं तापमान फार वाढतं. ज्याला आपण सामान्य भाषेत ताप येणं म्हणतो. जर वेळेवर आपण तापावर उपचार केला नाही तर ताप डोक्यात जाऊ शकतो. ताप वाढणं म्हणजे आजार बळावत जाण्याचं लक्षणं असतं. त्यामुळे ताप वेळीच तपासण्यासाठी घरात थर्मामीटर असणं गरजेचं आहे. 100 पेक्षा अधिक शरीराचं तापमान असेल तर डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

पल्स ऑक्सिमीटर

कोविडच्या काळात रूग्णांच्या ऑक्सिजन लेवलमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे वेळीच रूग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घेतली जाऊ शकते. जर तुमच्याकडे ऑक्सिमीटर नसेल तर ऑक्सिजनची कमी आणि रूग्णालयात जाऊन ऑक्सिजन मिळणं याला वेळ लागू शकतो. त्यामुळे सध्याच्या घडीला घरी पल्स ऑक्सिमीटर असणं फायदेशीर आहे.

ब्लड प्रेशर मॉनिटर

ब्लड प्रेशर एक सायलेंट किलर मानला जातो. यामुळे हृदयासंदर्भातील अनेक समस्या बळावू शकतात. ब्लड प्रेशर हार्ट अटॅकचंही कारण ठरू शकतं. जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुमच्या घरी ब्लड प्रेशर मॉनिटर असलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही दररोज ब्लड प्रेशर तपासू शकता. तुमचं ब्लड प्रेशर सामान्यतः 120/80 असलं पाहिजे. 

ब्लड ग्लुकोज मॉनिटर

डायबेटीज सध्या एक सामान्य आजार बनला आहे. दीर्घकाळ असेलेली ब्लड ग्लुकोजची मात्रा हार्ट अटॅक, किडनीचं नुकसान तसंच स्ट्रोक यासांरख्या समस्या बळावते. त्यामुळे डायबेटीक रूग्णांनी नियमितपणे ब्लड ग्लुकोजची मात्रा तपासत राहिली पाहिजे. यासाठीच घरी ग्लुकोमीटर असलं पाहिजे.

नेब्युलायझर

दमा किंवा फुफ्फुसांच्या समस्येने ग्रस्त रूग्णांच्या घरी नेब्युलायझर असलं पाहिजे. कारण फुफ्फुसांशी संबंधित समस्यांसाठी नेब्युलायझरचा वापर करून औषध घेतलं जातं. सामान्यत: नेब्युलायझरच्या मदतीने औषध 5 ते 10 मिनिटांत फुफ्फुसांपर्यंत पोहोचते आणि दम्याचा किंवा सीओपीडीच्या रुग्णाला आराम मिळतो.