Ben stokes Home Robbery : सध्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सिरीज खेळवली जात असून या टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड टीम सोबत पाकिस्तानात आलेला स्टार खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्स याच्या घरी मोठी चोरी झाली आहे. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी कॅसल ईडन भागात असलेल्या बेन स्टोक्सच्या घरी चोरी झाली आणि महत्वाची गोष्ट ही की यावेळी त्याची दोन मुलं आणि पत्नी घरातच होती. बेन स्टोक्सने (Ben stokes) स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली.
बेन स्टोक्सने बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आवाहन केले आणि झालेला संपूर्ण प्रकार सांगितला. इंग्लंडच्या कर्णधाराने सांगितले की, 17 ऑक्टोबर रोजी मुखवटा घातलेल्या लोकांनी डरहमच्या कॅसल इडन भागात असलेल्या माझ्या घरावर दरोडा टाकला आणि चोरी केली. स्टोक्सने सांगितले की, गुन्हेगार बरेच दागिने आणि इतर अनेक मौल्यवान तसेच काही वैयक्तिक वस्तू घेऊन पळून गेले, ज्यापैकी अनेक वस्तू त्याच्या आणि कुटुंबासाठी भावनिकदृष्टीने विशेष होत्या.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सपासून आरसीबीपर्यंत कोणते खेळाडू रिटेन होणार? पाहा सर्व 10 संघांची यादी
बेन स्टोक्सने लिहिले की त्याच्यासाठी सर्वात त्रासदायक गोष्ट ही होती की चोरी झाली तेव्हा त्याची पत्नी आणि २ लहान मुलं घरीच होते. तरी स्टोक्सने सांगितले की, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही, पण या गोष्टीने त्यांना मानसिक आणि भावनिक धक्का पोहोचला आहे. स्टोक्सने लिहिलेल्या पोस्टमध्ये पोलिसांचे धन्यवाद मानले ज्यांनी कुटुंबाची मदत केली जेव्हा स्टोक्स पाकिस्तानात होता.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने चोरट्यांनी चोरलेल्या काही सामानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे चोरांना शोधण्यास मदत होईल. स्टोक्सने चोरीला गेलेल्या ज्या वस्तूंचे फोटो शेअर केले त्या वस्तूंमध्ये एक क्रिश्चियन डियॉर सारख्या लग्झरी ब्रॅण्ड्सच्या बॅग, युनायटेड किंगडमची माजी राणी एलिझाबेथकडून मिळालेले OBE पदक, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून मिळालेली सोन्याची अंगठी आणि इतर काही महागड्या चेन आणि लॉकेट्स यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. बेन स्टोक्सने आपल्या चाहत्यांना आवाहन केले की चोरी झालेल्या या गोष्टी कोणाला मिळाल्या किंवा याबाबत काहीही माहिती मिळाली तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा.