मुंबई : पूर्वी उन्हातून आलेल्यांना गूळ पाणी देण्याची प्रथा होती. चहामध्येही गूळाचा समावेश केलेला असे. आजकाल आपल्या आहारात गूळाचा समावेश अगदीच सीमीत स्वरूपात झाला आहे. मात्र केवळ आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील गूळाचा आहारात समावेश करणं हितकारी आहे.
अॅक्नेचा त्रास, चेहर्यावरील काळे डाग, पिंपल्स यांचा त्रास दूर करण्यासाठी गूळ फायदेशीर आहे. आहाराप्रमाणेच फेसपॅकमध्येही गूळाचा समावेश करता येऊ शकतो. गूळाच्या फेसपॅकसाठी चमचाभर गूळ, चमचाभर टोमॅटोचा रस, अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमुटभर हळद व ग्रीन टी मिसळा. हा फेसपॅक 15 मिनिटं चेहर्यावर लावा. त्यानंतर तोंड थंड पाण्याने स्वच्छ धुवावे.
जसे वय वाढतं तसे चेहर्यावर अकाली सुरकुत्या पडण्याचं प्रमाणही वाढतं. गूळामधील अॅन्टी ऑक्सिडंट घटक शरीरात फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात. नियमित गूळ खाल्ल्याने सुरकुत्या कमी होतात.
गूळामुळे चेहर्यासोबतच केसांचेही आरोग्य खुलते. गूळात मुलतानी माती, दही, पाणी मिसळून पॅक बनवा. हा पॅक केसांवर लावल्यानंतर तासाभराने स्वच्छ धुवाव. यामुळे केस घनदाट आणि मुलायम होतात.
गूळामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन घटक मुबलक असतात. हे नॅचरल क्लिंजरप्रमाणे काम करतात. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं याचा परिणाम चेहर्यावर दिसतो. पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्यासोबत गूळाचा खडा खाल्ल्यास किंवा चहामध्येही साखरेऐवजी गूळ वापरावा.
रक्त साफ असल्यास त्वचाविकार वाढत नाहीत. गूळामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. अॅनिमियाचा त्रास कमी करण्यासही त्याची मदत होते. मधुमेही आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गूळाचा आहारत किती प्रमाणात समावेश करावा हे ठरवावे.