नवी दिल्ली: निपाह व्हायरसने अनेकांना घाबरवून टाकले आहे. अशात इंडियन होमियोपॅथीक मेडिकल असोसिएशने निपाह व्हायरसवर नियंत्रण मिळवणारे औषध तयार केल्याचा दावा केला आहे. मेडिकल असोसिएशनचे अधिकारी बी. उन्नीकृष्णन यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे सर्व प्रकारच्या तापावर योग्य तो उपचार करणारी औषधे आहेत. त्यामुळे निपाह व्हायरसग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी आम्हाला मान्यता मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. असोसिएशनने आरोग्य राज्यमंत्री के. के. शैलजा यांच्याकडे मागणी केली आहे की, आम्हाला उपचारासाठी असे रूग्ण द्या ज्यांची तपास चाचणी पॉजिटीव्ह आली आहे.
दरम्यान, आरोग्य सचिव राजीव सदानंद यांनी प्रसारमाध्यमांशी रविवारी संवाद साधला. ते म्हणाले, 'होमियोपॅथीक विभाग थेट माझ्या अधिकार कक्षेखाली काम करतो. तसेच, आतापर्यंत माझ्याकडे किंवा माझ्या विभागाकडे कोणीही संपर्क साधला नाही.' पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, १८ रूग्णांपैकी ४ रूग्ण निपाह संक्रमीत होते. निपाहची लागण झालेल्या रूग्णांशी आमच्या विभागाचा थेट संपर्क आला नसल्याचेही ते म्हणाले.
सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, निपाह व्हायरसची लागण होण्याचा धोका असल्याच्या कारणावरून रूग्णांवर थेट उपचार करण्यास डॉक्टरांना मज्जाव करण्यात आला. पण, त्याबाबत समाज माध्यमांमध्ये (सोशल मीडिया) त्याबाबत अत्यंत चुकीच्या बातम्या आल्या हे फार दुर्दैवी आहे. पण, घाबरण्याची काहीच गरज नाही.
दरम्यान, निपाह व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या व्हायरसची लागण झाल्यापैकी दोघांची प्रकृती सुधारली आहे. निपाहग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या २००० रूग्णांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.