दिल्ली : सर्वांना बूस्टर डोस कधी मिळणार आणि बूस्टर डोस कधी घ्यावा हे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. दरम्यान या प्रश्नावर आता WHOने उत्तर दिलं आहे. WHOच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस आता लोकांना दिला पाहिजे.
WHOने म्हटलंय की, बूस्टर डोस देण्याची सुरुवात कमकुवत लोकांपासून केली पाहिजे. यापूर्वी डब्ल्यूएचओने निरोगी प्रौढांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं.
डब्ल्यूएचओने म्हटलं की, जागतिक लस पुरवठ्याची स्थिती सुधारताना दिसतेय. त्यानंतर आता फायझर-बायोटेक लसीच्या बूस्टर डोसची शिफारस करण्यात येतेय. पहिल्या दोन डोसनंतर सुमारे चार ते सहा महिन्यांत बूस्टर डोस देण्यात यावा.
गेल्या वर्षी, WHO ने विकसीत देशांना 2021च्या अखेरीस बूस्टर डोस देण्याची मोहीम थांबवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केलं होतं.
बूस्टर डोसच्या डेटाचं तज्ज्ञांच्या गटाने मूल्यांकन केलं. यानंतर त्यांना लोकांच्या immune protectionमध्ये घट झाल्याचं लक्षात आले. अलिकडच्या काही महिन्यांतील अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलंय की, बूस्टर डोस एंटीबॉडीची पातळी रिस्टोर करतात. यामुळे डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या कोविडच्या व्हेरिएंटपासून संरक्षण मिळण्यास मदत होते.
डब्ल्यूएचओचे डॉ. केट ओब्रायन म्हणाले, "बूस्टर डोस हे लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे. परंतु बूस्टर डोस सर्व वयोगटांसाठी वापरायचा नाही. आम्ही सर्वोच्च प्राथमिकता असलेल्या गटांच्या लसीकरणाकडे लक्ष देत आहोत."
कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जातोय. सध्या देशातील वृद्ध, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस दिला जातोय.