मुंबई : कोरोनाने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 14 रूग्ण असून देशात ही संख्या 73वर पोहोचली आहे. असं असताना अनेक अफवांना उधाण आलं आहे. मोबाइल वापरणं आणि ऑनलाइन शॉपिंग करणं या गोष्टी कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या ठरणार आहेत का? अशी चर्चा सुरू असताना झी 24 तासने डॉक्टरांशी संपर्क साधुन यामागचं नेमकं कारण जाणून घेतलं आहे.
कोरोना व्हायरससोबतच अफवांचं पेव फुटलंय. कोरोनापासून दूर राहण्यासाठी नागरिक नवनवे उपाय शोधत आहेत. अशातच मोबाइल आणि ऑनलाइन शॉपिंग हे कोरोनाला आमंत्रण देणार ठरतंय अशी चर्चा होती.
सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोना व्हायरस हा काही ऑनलाइन शॉपिंग करून अथवा मोबाइल वापरून पसरत नाही. कोरोनाचं संसर्ग हा खोकल्यातून आणि हातातून पसरत आहे. त्यामुळे कुणाला खोकला झाल्यास त्याची पहिली दक्षता घ्यावी.
आता कोरोना हा मोबाइल मार्फत पसरत नाही. पण मोबाइल ही अशी वस्तू आहे जी आपण 24 तास हाताळत असतो. झोपताना, पाण्याशी संबंधित काम करताना मोबाइलचा वापर होत नाही. महत्वाचं म्हणजे कोरोनाचं विषाणू हे एखाद्या सरफेसवर स्थिरावतात. मोबाइलचा सरफेसला आपण सतत हात लावत असतो. आणि हे हात आपल्या चेहऱ्याजवळ लागले तर त्याची लागण होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी मोबाइलचा वापर थोडा कमी करावा.
ऑनलाइन शॉपिंगमार्फत कोरोना पसरतोय हे साफ चुकीचं आहे. अगोदरच आपण अफवांच्या माध्यमातून अनेक उद्योगांचे नुकसान केलं आहे. मुळात आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत त्याम्हणजे हा साथीचा रोग हा फक्त हाताद्वारे आणि खोकल्याद्वारे पसरतोय. यामुळे याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे.
कोरोना व्हायरस येऊन आतापर्यंत फक्त काही महिने झाले आहेत. त्यामुळे याबाबत आता ठामपणे बोलणे चुकीचे ठरले. आताची शंका ही उद्या एखादी ठाम गोष्ट होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता कोरोनाशी सामना करायला हवा. महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी आपण स्वतः करायला हवी, अशी माहिती श्वसनविकार तज्ज्ञ, डॉ. अरविंद काटे यांनी दिली आहे.