मुंबई : काही देशांमध्ये नवा संसर्ग मंकीपॉक्सचं प्रमाण वाढताना दिसतंय. यानंतर आता भारतातही खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. त्यामुळे आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जातंय, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेत.
यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितलं की, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि ICMR परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतील.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विमानतळ आणि बंदरातील आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत.
एका अधिकृत सूत्राकडून माहिती मिळाली की, "मंकीपॉक्सचे रूग्ण असलेल्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या कोणत्याही आजारी प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येईल. त्यानंतर याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या बीएसएलकडे तपासणीसाठी पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत."
यूके, यूएसए, पोर्तुगाल, स्पेन आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये मांकीपॉक्सच्या संसर्गाची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स सामान्यत: ताप, पुरळ आणि सुजलेल्या लिम्फ नोड्ससह माणसांमध्ये दिसून येतो. हे गंभीर देखील असू शकते.