Indigestion : चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे. शिवाय यावेळी तुमच्या आहारात पौष्टिक आणि संतुलित गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. मात्र केवळ आहार घेणं पुरेसं नाही. तर घेतलेल्या आहाराचं योग्यरित्या पचन देखील व्हायला पाहिजे. जर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होत नसेल तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी तुमच्या अन्नाचं पचन होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्हाला शरीरात काही लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत?
ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची पचनसंस्था कमकुवत असते तेव्हा त्या व्यक्तीला पोटाच्या वरच्या भागात जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. यावेळी छाती आणि नाभीच्या मधल्या भागात जळजळ आणि अस्वस्थता जाणवू लागते. मुळात हे शरीरातील खराब पचनाचं लक्षण मानलं जातं. छातीत जळजळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ल तयार होणं. जर तुम्हालाही ही समस्या सतत जाणवत असेल तर समजून जावं की, तुम्हाला अपचनाचा त्रास होतोय.
अनेकवेळा जेवल्यानंतर तुम्हाला जडपणा वाटू लागतो. जेवणानंतर बराच काळ हा जडपणा काही कमी होण्याचं नाव घेत नाही. जर तुम्हाला देखील हा त्रास जाणवत असेल तर ते शरीरातील खराब पचनाचं लक्षण आहे. यावेली एक लक्षात घ्यावं की, जेवण अर्ध झाल्यानंतर देखील जडपणा वाटत असेल तर ते शरीरातील खराब पचनाचे लक्षण आहे. हे असं होण्यामागे कारण म्हणजे तुम्हाला खालेल्लं अन्न नीट पचत नसल्याचे संकेत आहेत.
अपचन झालं की व्यक्तीला भूक लागत नाही. मुळात ज्यावेळी तुमचं शरीर अन्न नीट पचवू शकत नाही, तेव्हा तुमच्या भुकेच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. म्हणजेच यापूर्वीचं खाल्लेले अन्न तुमच्या पोटात नीट पचलं नाही, तर पुढच्या वेळी खाण्याची इच्छाच होणार नाही. त्यामुळे भूक न लागणं हे देखील अपचनाचं एक लक्षणं मानलं जातं.
गॅस होणं किंवा ढेकर येणं ही शरीराच्या वरच्या पचनमार्गातून अतिरिक्त हवा बाहेर काढण्याची प्रक्रिया असते. ढेकर येणं किंवा वायू बाहेर पडणं हे नैसर्गिक आणि सामान्य मानले जाते. मात्र ज्यावेळी हा त्रास वारंवार होतो तेव्हा तेव्हा ते पचनसंस्थेतील बिघाडाचं लक्षण देखील असू शकतं. पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होणं आणि वारंवार वायू निघणे हे देखील खराब पचनाचे लक्षण आहे.
अनेकदा जेवणानंतर मळमळ किंवा उलटी होण्याची समस्या उद्भवू शकते. यावेळी अनेक कारणांमुळे उलट्या आणि मळमळ होऊ शकते. परंतु जेव्हा वारंवार मळमळ होते किंवा उलट्या होत असतील तर ते शरीरातील खराब पचनाचे लक्षण देखील असू शकते. तुम्ही खाल्लेले अन्न नीट पचले नाही तेव्हा तुम्हाला उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)