अहमदाबाद: गीरच्या जंगलात मागील ११ दिवसांत ११ सिंहांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दलकहनिया परिसरात सिंहांचे मृतदेह मिळाले. याप्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिलेत. बुधवारी अमरेली जिल्ह्यातील राजुला भागात काही सिंहांचे मृतदेह मिळाले त्यानंतर आणखी तीन सिंहांचे मृतदेह त्याच दिवशी दलकहनियाजवळ मिळाले. या सगळ्या मृतदेहांचा व्हिसेरा जुनागड येथील वन्य प्राण्यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर सिंहांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. दरम्यान, वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी या ११ सिंहांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.