नवी दिल्ली : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आसाममध्ये 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आपला महत्वपूर्ण निकाल दिला आहे. 'नॅशनल डेमोक्रॅटीक फ्रंट ऑफ बोडोलॅंड' ( एनडीएफबी) च्या प्रमुखासहित दहा आरोपींना बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या स्फोटामध्ये 88 जण मारले गेले होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश अपेरश चक्रवर्ती यांनी दायमारी, जॉर्ज बोडो, बी थरई, राजू सरकार, अंचई बोडो, इन्द्र ब्रह्मा, लोको बासुमतारी, खरगेश्वर बासुमतारी, अजय बासुमतारी आणि राजन गोयारी यांना शिक्षा सुनावली. न्यायालयाने तीन इतर दोषी प्रभात बोडो, जयंती बसुमतारी आणि मथुरा ब्रह्मा यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. दंडाची रक्कम भरल्यानंतर त्यांची सुटका होणार आहे.
निलिम दायमारी आणि मृदुल गोयारी यांच्या सुटकेचे आदेश सीबीआय न्यायालयाने दिले आहेत कारण त्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे. दायमारी आणि 14 इतर आरोपींवर सोमवारी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
दोषी ठरवल्यानंतर तात्काळ एनडीएफबी प्रमुखाचा जामिन रद्द करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. तर इतर 14 जण आधीच न्यायालयीन कोठडीत होते. एनडीएफबीने 30 ऑक्टोबर 2008 ला गुहावटी येथे तीन-तीन, बारपेटामध्ये दोन आणि बोंगईगावमध्ये एक स्फोट घडवून आणला होता. या स्फोटामध्ये 88 जणांचा नाहक बळी गेला तर इतर 540 जण जखमी झाले.
सीबीआयच्या आधी या प्रकरणाची चौकशी आसाम पोलीस करत होते. सीबीआयने दोन आरोपपत्र दाखल करुन 22 आरोपींची नावे समोर आणली. यातील सातजण अजूनही फरार आहेत. पहिले आरोपपत्र 2009 मध्ये तर दुसरे आरोपपत्र 20 डिसेंबर 2010 मध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी सुनावणीस 2011 मध्ये सुरूवात झाली. फास्ट ट्रॅक न्यायालयाने 2017 साली हे प्रकरण स्वत:कडे घेतले.
सुनावणी दरम्यान 650 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. दैमारीला 2010 साली बांगलादेशमधून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला गुहावटी सेंट्रल जेलमध्ये हलविण्यात आले. 2010 मध्ये त्याला सशर्थ जामिन मंजूर करण्यात आला. दैमारीवर जनसभा आणि माध्यमांसमोर येण्यास बंदी घालत 8 अटी ठेवण्यात आल्या. दैमारी व्यतिरिक्त इतर न्यायालयिन कोठडीत आहेत.