नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आदल्या दिवशी तीन मोठे झटके बसले आहेत. पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या प्रसारणाला निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. नमो टीव्हीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत. तर राफेलबाबत फेरविचार याचिकांवर सुनावणी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
१. पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिलीय. आयोगाने माहिती आणि प्रसारण खात्यासह सेन्सॉर बोर्डाला याबाबतचे निर्देश दिलेत. हा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार होता. पण आता निवडणुकीपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
२. स्थानिक निवडणूक आयोगाच्या संमतीपत्राशिवाय नमो टिव्ही वाहिनीवर कार्यक्रम दाखवता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक काळत राज्य आणि जिल्हा पातळीवर स्थानिक निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात येते. त्यांच्या माध्यमांतूनच राजकीय मोहिम आणि जाहिराती चालवण्यात येतात. दरम्यान, विरोधकांनी नमो टीव्ही वरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर आक्षेप घेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. अखेर स्थानिक निवडणूक आयोगाच्या संमतीपत्राशिवाय नमो टिव्ही वाहिनीवर कार्यक्रम दाखवता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
३. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राफेलप्रकरणी केंद्र सरकारला झटका लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत फेरविचार याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना मर्यादीत यश मिळालं आहे. याचिकाकर्त्यांची तीनच कागदपत्र ग्राह्य धरत आदेशाचा फेरविचार शक्य असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. गहाळ झालेल्या कागदपत्रांना ग्राह्य मानू नका हा केंद्राचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे.