धक्कादायक, कुनो अभयारण्यात दोन महिन्यात 6 चित्त्यांचा मृत्यू

Two more cheetah cubs die : मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आणखी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला. भारतातील चित्त्यांच्या मृत्यूचे कारणांचा अभ्यास आफ्रिकेत केला जाणार आहे. त्यासाठी कुनो अभयारण्यातील अधिकाऱ्यांचे पथक नामिबियाला जाणार आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 31, 2023, 08:15 AM IST
धक्कादायक, कुनो अभयारण्यात दोन महिन्यात 6 चित्त्यांचा मृत्यू title=

Two more cheetah cubs die : मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आणखी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यात 6 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. आता भारतातील चित्त्यांच्या मृत्यूचे कारणांचा अभ्यास आफ्रिकेत केला जाणार आहे. त्यासाठी कुनो अभयारण्यातील अधिकाऱ्यांचे पथक नामिबियाला जाणार आहे. 

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाची क्षमता एवढ्या चित्त्यांना समावून घेण्याची नाही, त्यांच्यासाठी पुरेशी शिकार उपलब्ध नाही अशा अनेक तृटी तज्ज्ञांनी सांगितल्या होत्या. त्यामुळे उपासमारीने या चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही राजस्थानमधील मुकुंद्रा अभयारण्यात चित्त्यांचं स्थलांतर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ते निर्देशही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या बैठकीत फेटाळण्यात आले. राजस्थानात काँग्रेस सरकार असल्याने या सूचनेकडे पाठ फिरवली का, अशी शंका वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली.

मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात दोन महिन्यात 6 चित्त्यांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोट्यवधी खर्च करुन आफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये, मध्य प्रदेश वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला पत्र लिहून जुनो येथे चित्तांसाठी पर्यायी जागेची विनंती केली होती. मात्र, ही विनंती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही.  

कुनो राष्ट्रीय उद्यानात असलेल्या मादी चित्ता ज्वाला हिने  24 मार्चला चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यामधील एका बछड्याचा 23 मेला मृत्यू झाला होता. तर, गुरुवारी 25 मे रोजी दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. चित्त्यांच्या मृत्यूची या महिन्यातील ही तिसरी घटना होती. 23  मे रोजी उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस होता. त्यामुळे चारही बछड्यांना उष्माघाताची समस्या जाणवली. याची माहिती मिळताच कुनो उद्यानातील प्राणी मित्रांनी बछड्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

दरम्यान, मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणले होते. आतापर्यंत कुनो अभयारण्यात 20 चित्ते आणण्यात आले होते. यातील तीन चित्त्यासह तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झालेला. तर, ‘उदय’ हा चित्ता 23 एप्रिलला निश्चल अवस्थेत आढळून आला होता. नंतर त्याचाही मृत्यू झाला. ‘दक्षा’ या मादीचा 9 मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला होता. आता ‘ज्वाला’ या मादीच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे.