नवी दिल्ली: सुनारिया कारागृहाकडे पाहून नमस्कार करणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आठही जण डेरा सच्चा सौदाचा गुरमीत राम रहीम याचे अनुयायी आहेत. त्यापैकी एक जण त्याचा चालक आहे. हे आठ जण ज्या कारने कारागृहाकडे आले होते ती कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. राम रहिम सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. २८ ऑगस्ट २०१७ला ही शिक्षा सुनावन्यात आली. राम रहीमला शिक्षा सुनावन्यासाठी रोहतकच्या सुनरिया कारागृह परिसरातच सुनवाई घेण्यात आली होती. त्या आधी २५ ऑगस्टला पंचकूलामध्ये सीबीआयचे विशेष न्यायाधीश जगदीप सिंह यांनी राम रहिम याला दोषी ठरवले होते. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. त्यामुळे राम रहिमला हेलिकॉप्टरमधून रोहतकला पाठविण्यात आले होते. तेव्हापासून राम रहीम याच कारागृहात आहे.
राम रहीमच्या अनुयायांकडून कारागृहाकडे जाण्याच्या रस्त्यावर जमन्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून वारंवार सुरू आहे. तसे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत स्पष्टपणे दिसते की, राम रहीमचे अनुयायी हात जोडू जेलकडे उभे असतात. राम रहिमसोबत कारागृहाच्या आत जाऊन त्याचे कुटुंबिय आणि वकील संवाद करू शकतात. या काळाला राम रहिमचे अनुयायी कारागृहापासून एक किलोमिटर अंतरावर पोहोचतात. तेथे ते हात जोडून उभे राहतात.