गुजरातमध्ये ग्राहकांनी मोठ्या विश्वासाने बँकेत जमा केलेले दागिनेच लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेच्या मॅनेजरने ग्राहकांनी बँकेत जमा केलेलं तब्बल 2 कोटींचं सोनं लुटलं आणि त्याजागी खोटे दागिने ठेवले. पोलिसांनी याप्रकरणी बँक मॅनेजर आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी बँकेच्या शाखेतील सेल्स मॅनेजर राम सोलंकी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांचा अंदाज आहे की, ही रक्कम 9 कोटींपर्यंत जाऊ शकते. याचं कारण बँक अधिकाऱ्यांनी अद्याप दागिन्यांच्या 10 पाकिटांची छाननी केलेली नाही.
पोलिसांनी सांगितलं आहे की, अटक केलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांची ओळख शाखेच्या गोल्ड लोन विभागाचे विक्री व्यवस्थापक मानसिंग गढिया आणि त्यांचे कर्मचारी विपुल राठोड आणि पिंकी खेमचंदानी अशी आहेत. गीर सोमनाथचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोहर सिंह जडेजा यांनी सांगितलं की, त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट यासह अनेक आरोपांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मनोहर सिंह जाडेजा यांनी सांगितलं आहे की, त्यांना बँक अधिकाऱ्यांकडून या गुन्ह्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना वेरावल शाखेच्या सोनं विभागात काहीतरी गडबड सुरु असल्याचं सांगितलं होतं. प्राथमिक तपासानंतर, शाखा व्यवस्थापकाने बँकेच्या 3 कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या 2 वर्षांपासून ही फसवणूक सुरु असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं होतं. एफआयआरनुसार, एक वरिष्ठ अधिकारी गेल्या आठवड्यात अचानक ब्रांचमध्ये दौऱ्यावर गेले असता ही फसवणूक समोर आली.
अधिकाऱ्याने तपासणी केली असता, ग्राहकांनी जमा केलेल्या सोन्याच्या पाकिटांचं वजन कमी असल्याचं लक्षात आलं. यावेळी सेल्स मॅनेजरने सोनं खरं आहे असं सांगितल होतं. अधिकाऱ्याने अधिक तपासणी केली असता पॅकेटच्या लेबलशी छेडछाड करण्यात आली होती. यानंतर सर्व पाकिटं उघडून पाहिली असता त्यातील 6 पाकिटात खोटं सोनं होतं. म्हणजे 2 कोटींचे सोन्याचे दागिने बदलून तिथे खोटे दागिने ठेवण्यात आले होते.
अशी एकूण 426 पाकिटं आहेत. या सर्व पाकिटांची नव्याने छाननी होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात 10 पाकिटात बनावट दागिने सापडले आहे. शुद्धतेचं ऑ़डिट केल्यानंतर जेव्हा दागिन्यांची पाकिटं शाखेत येत असत तेव्हा हे तिघे त्याचं सील काढायचे आणि बनावट दागिन्यांची अदलाबदल करत असते.
यानंतर आरोपी लुटलेलं खरं सोनं वापरून बँकेत कर्ज काढण्यासाठी बनावट ग्राहक पाठवत असत. त्यांनी अशाप्रकारे 400 बनावट ग्राहकांना कर्ज दिलं. फसवणुकीची ही रक्कम 8 ते 9 कोटींपर्यत जाईल असा अंदाज आहे.