Viral Video: आपल्याला जर विनाकारण एखाद्याने दुखापत केली किंवा मारहाण केली तर चिडणं स्वाभाविक आहे. अनेकदा हा संताप इतका असतो, की त्याचा धडा शिकवण्याची शपथ घेतली जाते. त्यातून एखाद्याच्या हातून अघटित घडण्याची भीतीही नाकारता येत नाही. पण प्राण्यांनी कधी असा बदला घेतलेलं तुम्ही पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. पण प्राणीही असा बदला घेतात आणि हे मध्य प्रदेशातील एका घटनेमुळे सिद्ध झालं आहे. येथे एका श्वानाने बदला घेण्यासाठी कारवर पायाने ओरखडे मारले.
शहरातील तिरुपती पुरम कॉलनीतील रहिवासी प्रल्हाद सिंग घोशी 17 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह निघाले. घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर वळण घेत असताना, घोशी यांच्या कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका श्वानाला चुकून धडक दिली. धडक किरकोळ होती आणि कुत्र्याला शारीरिक दुखापतही झाली नाही. त्यामुळे फारसं कोणी लक्ष दिलं नाही.
पण, कुत्र्याने गाडीचा पाठलाग केला आणि दिसेनासा होईपर्यंत भुंकत राहिला. अनेक तासांनंतर, घोशी आणि त्याचे कुटुंब पहाटे 1 वाजता घरी परतले. काही वेळातच, श्वानाने गाडीवर हल्ला केला आणि तिच्यावर ओरखडे सोडले.
घोशी कुटुंबाने सकाळी कार पाहिली तेव्हा त्यावरील ओरखडे पाहिल्यानंतर धक्का बसला. सुरुवातीला त्यांना एखाद्या लहान मुलाने हे केलं असावं असं वाटलं. पण सीसीटीव्ही पाहिल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.