Delhi Car Accident: दिल्लीमध्ये एका भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. कारने त्यांच्या स्कुटीला धडक दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारने स्कुटीवरील चालकाला तब्बल 350 मीटरपर्यंत फरफटत नेलं. केशवपुरम भागात शुक्रवारी पहाटेच्या ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी कारमधील पाचही तरुणांना अटक केली आहे. हे सर्व तरुण 19 ते 21 वयोगटातील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील तरुण एका लग्न समारंभातून परतत होते. यावेळी सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. आपल्या कारमधून ते राजधानीत फेरफटका मारत होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या गस्त पथकाला एक कार स्कुटरला फरफटत नेत असल्याचं दिसलं.
कैलाश भटनागर आणि सुमीत हे स्कुटीवरुन निघाले होते. कारची धडक इतकी जोरात होती की, कारचं बोनेट उघडलं आणि हवेत उडालेले कैलाश बोनेट आणि विंडशिल्डच्या मधोमध अडकले. सुमीतदेखील हवेत उडून कारच्या छतावर जाऊन आदळले आणि खाली पडले. स्कूटर कारच्या बंपरमध्ये अडकली होती.
अपघातानंतर आरोपींनी कार थांबवण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि कैलाश यांनी फरफटत नेलं. हेड कॉन्स्टेबल सुरजीत सिंग आणि राम किशोर यांनी 350 मीटरपर्यंत कारचा पाठलाग केला आणि त्यांना रोखलं. यानंतर कारमधील प्रवीण आणि दिव्यांश यांनी खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अटक करण्यात आली.
कैलाश आणि सुमीत यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी कैलाश यांना मृत घोषित केलं. सुमीत यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा प्रवीण कार चालवत होता. कारमधील इतर तिघे ओम भारद्वाज, हर्ष मुगदल आणि देवांश यांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.
#WATCH | Delhi: A car rammed into a scooty & dragged a rider on its roof for about 350 m when he landed on it after being thrown into the air due to the impact of the collision. 5 accused arrested. FIR registered at Keshav Puram PS.
One scooty rider died, other is hospitalised pic.twitter.com/ktnnzyjLZQ
— ANI (@ANI) January 27, 2023
आरोपींमधील एकाने नुकतीच 12 वी उत्तीर्ण केली असून, पुढील शिक्षण घेत होता. वैद्यकीय चाचणीत अपघात झाला तेव्हा सर्वांनी मद्यपान केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपायुक्त (उत्तर-पश्चिम दिल्ली) उषा रंगराणी यांनी सांगितलं आहे की "आम्ही पाचजणांना अटक केलं आहे. तपासादरम्यान, कारच्या नंबरशीही छे़डछाड करण्यात आल्याचं उघड झालं आहे. पुढील प्लेटवर नंबर नव्हता, तर मागील नंबर झाकण्यात आला होता. पुढील तपास सुरु आहे".