ज्याच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये गेले 'तो' मामा 17 वर्षांनी जिवंत आला; म्हणाला 'मी तर...'; पोलिसांसह सगळेच हादरले

बिहारमधील झांशी येथे 17 वर्षांपूर्वी हत्या झालेली व्यक्ती जिवंत असल्याचं आढळल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.   

शिवराज यादव | Updated: Jan 8, 2025, 05:33 PM IST
ज्याच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये गेले 'तो' मामा 17 वर्षांनी जिवंत आला; म्हणाला 'मी तर...'; पोलिसांसह सगळेच हादरले title=

बिहारच्या झांशी येथील एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. याचं कारण 17 वर्षांनी मृत जाहीर करण्यात आलेली व्यक्ती जिवंत असल्याचं आढळलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्या हत्येच्या आरोपात चार जण जेलमध्येही गेली. यामध्ये त्याचा मामा आणि भावांचा समावेस आहे. मामाचा मृत्यू झाला असून, तिघे भाऊ सध्या जामिनावर बाहेर आहेत. झांशी पोलिसांना बिहार पोलिसांच्या रेकॉर्डनुसार मृत असलेली ही व्यक्ती जिवंत असल्याचं आढळल्यानंतर प्रकरण उजेडात आलं. 

6 जानेवारीला गस्त घालत असताना झांशी पोलिसांना एक व्यक्ती आढळली आणि संशय आला. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान ही व्यक्ती गेल्या सहा महिन्यांपासून गावात राहत असल्याचं समोर आलं. त्याची ओळख नथुनी पाल अशी पटली. तसंच तो 50 वर्षांचा असून बिहारच्या देवरियाचा रहिवासी असल्याचं उघड झालं. 

अजून चौकशी करण्यात आली असता, तो एकटा राहत असून नुकताच झांशी येथे रहाण्यास आला असल्याचं समोर आलं. त्याने पोलिसांना सांगितलं की, "मी लहान असताना माझ्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या पत्नीने कित्येक वर्षांपूर्वी मला सोडलं आहे. माझ्या बिहारमधील घरी जाऊन मला आता 16 वर्षं झाली आहेत".

2009 मध्ये नथुनी पाल आपल्या घऱातून बेपत्ता झाले होते. नथुनी पालच्या एका मामाने दुसऱ्या मामाविरोधात आणि चौघा भावांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी जमीन हडपली आणि हत्या केली असा आरोपी त्यांनी केला. 

"माझा मोठा भाऊ जो पोलिसात आहे त्याचंही नाव तक्रारीत होतं. पण त्याने अधिकाऱ्याकडे विनंती केल्यानंतर नाव एफआयआरमधून मागे घेण्यात आलं होतं," असं हत्येचा आरोप असणाऱ्या भावांपैकी एक असणाऱ्या सत्येंद्र पाल याने सांगितलं. माझे वडील आणि दोन भावांनी जेलमध्ये आठ महिने घालवले. सध्या आम्ही जामिनावर बाहेर आहोत असंही त्याने सांगितलं. 

नथुनी पाल जिवंत असल्याचं समजल्यानंतर सत्येंद्र पालला अश्रू अनावर झाले. आम्ही आता हत्येच्या आरोपातून मुक्त झाल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. दरम्यान हे प्रकरण अद्याप कोर्टात आहे. झांशी पोलिसांनी नथुनी पाल यांना बिहार पोलिसांकडे सोपवलं आहे.