...म्हणून मणिपूर होरपळल्यानंतर 2 वर्षांनी बिरेन सिंह CM पदावरुन पायउतार; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Manipur CM Biren Singh Resigns: बिरेन सिंह यांच्याच कारकिर्दीत गेली दोन वर्षे मणिपूर वांशिक वणव्यात होरपळून निघाले, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 11, 2025, 07:14 AM IST
...म्हणून मणिपूर होरपळल्यानंतर 2 वर्षांनी बिरेन सिंह CM पदावरुन पायउतार; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल title=
मणिपूरवरुन साधला निशाणा

Manipur CM Biren Singh Resigns: "हिंसाचारग्रस्त मणिपूरबाबत जो निर्णय भाजपने दोन वर्षांपूर्वीच तडकाफडकी घ्यायला हवा होता, तो त्यांनी आता घेतला. मणिपूरचे वादग्रस्त आणि अपयशी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी अखेर रविवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिरेन सिंह यांच्याच कारकिर्दीत गेली दोन वर्षे मणिपूर वांशिक वणव्यात होरपळून निघाले. मात्र ना बिरेन सिंह मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार होते, ना भाजपकडून त्यांच्यावर दबाव टाकला गेला. आता उशिरा का होईना, बिरेन सिंह यांना पायउतार करण्याची उपरती भाजपश्रेष्ठींना झाली. अर्थात, मणिपूरमधील वांशिक हिंसाचार आटोक्यात आणण्यात अपयश आल्याची शिक्षा म्हणून बिरेन सिंह यांना भाजपने पायउतार केले असे समजण्याचे कारण नाही. भाजपश्रेष्ठींना एवढीच संवेदनशीलता असती तर त्यांनी बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर दोन वर्षे होरपळू दिले नसते," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

बिरेन सिंह यांचा ‘धोंडा’ पायावर पाडून घेण्यापेक्षा...

"आता परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की, भाजपसमोर दुसरा पर्यायच उरला नव्हता. एक तर बिरेन यांचा राजीनामा घ्या आणि कशीबशी सत्ता वाचवा, नाहीतर मणिपूरमधील सत्ता गमवा, हे दोनच पर्याय भाजपसमोर होते. मणिपूर विधानसभेच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेस पक्ष बिरेन सिंह सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार हे निश्चित होते. त्याला भाजपमधीलच असंतुष्ट आणि बिरेन सिंह यांच्यावर नाराज असणाऱ्या आमदारांची साथ मिळणार असेदेखील चित्र होते. या आमदारांच्या गटाने त्याची कल्पना भाजप धुरिणांना दिली होती. कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने तर आधीच या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. अशा स्थितीत बिरेन सिंह यांचा ‘धोंडा’ पायावर पाडून घेण्यापेक्षा त्यांना ‘नारळ’ देऊन सरकार वाचविण्याचा मार्ग भाजपने निवडला," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हे अनेक प्रश्न अनुत्तरितच

"विधानसभा अधिवेशनाचा आदला दिवस हा बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त म्हणून निवडण्यात आला. त्यामुळे साहजिकच विधानसभेचे नियोजित अधिवेशनही स्थगित झाले आणि भाजपलाही बिरेन यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी, सरकार वाचविण्यासाठी उसंत मिळाली. बिरेन सिंह राजवट संपल्याने मणिपूरमधील सामान्य जनतेने नक्कीच सुटकेचा निःश्वास टाकला असेल. मात्र हा निःश्वास किती काळ टिकणार, हाही प्रश्नच आहे. कारण मणिपूरमधील वांशिक वणवा कधी विझणार? कुकी आणि मैतेई समाजात निर्माण झालेले वैर आणि परस्पर अविश्वास कसा संपणार? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजपने पेटविलेले तेथील जनजीवन पूर्वपदावर कधी येणार? नवीन मुख्यमंत्री हे आव्हान पेलू शकतील का? मणिपूरमध्ये राजकीय स्थिरता येणार का? असे अनेक प्रश्न बिरेन सिंह यांच्या राजवटीने निर्माण केले आणि ते त्यांच्या राजीनाम्यानंतरही अनुत्तरितच आहेत," असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

बिरेन सिंह पायउतार झाले तरी...

"वांशिक वणव्यात दोन वर्षांपूर्वी मणिपूर होरपळण्यास सुरुवात झाली तेव्हाच मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा भाजपने घेतला असता तर ‘अशांत मणिपूर’चे आव्हान उभे राहिलेच नसते. मेरी कोमसारख्या ऑलिम्पिकपटूने फोडलेल्या ‘माझे मणिपूर वाचवा हो’ या आर्त टाहोने दिल्लीतील सत्ताधाऱ्यांचे कानाचे पडदे थरथरले असते तर मणिपूर जातीय हिंसाचाराने उद्ध्वस्त झाले नसते. या वणव्याची ‘राजकीय ऊब’ घेण्याचा प्रयत्नच भाजपच्या आता अंगाशी आला आहे. काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला भाजपच्या आमदारांचीही साथ मिळेल या भीतीनेच भाजपला मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा घेणे भाग पडले आहे. भाजपने मणिपूरमध्ये केलेल्या घोडचुकांचे हे प्रायश्चित्त नाही. बिरेन सिंह यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा म्हणजे भाजपने जातीय वणव्यात भस्मसात केलेल्या मणिपूरच्या राखेवर पाणी ओतण्याचे नाटक करण्यासारखे आहे. यामुळे तेथील आग काही प्रमाणात विझल्यासारखे होईलही, परंतु मनामनांतील विद्वेषाची धग कधी शांत होणार? मणिपूरच्या जनतेला प्रत्यक्ष भेटून दिलासा द्यावा, असे आता तरी पंतप्रधानांना वाटेल का? सामाजिक जीवनावर झालेले घाव कसे भरून निघणार? हे घाव भरून काढावेत असे भाजपला मनापासून वाटते का? बिरेन सिंह पायउतार झाले तरी असंख्य प्रश्न कायमच आहेत," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.