मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : शिक्षण किंवा तत्सम कारणांनी अनेकदा मुलं राहतं घर सोडून वसतीगृह किंवा तसेच काही पर्याय निवडत नव्या शहरांच्या वाटा धरतात. पण, या वाटा निवडणं अनेकदा त्यांना काहीसं महागात पडतं. नवं शहर, राहण्याचं नवं ठिकाण, खाण्यापिण्याच्या सोयींमध्ये होणारे बदल आणि अनेकदा होणारी गैरसोय याच वास्तवाचा सामना करावा लागतो. सध्या वर्ध्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला असून, या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वर्धा येथील पिपरी मेघे परिसरात असलेल्या बजाज इंजिनिअरिंग महाविद्यालयात वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. ज्यानंतर तब्बल 29 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मेसवरील मंच्युरीयन आणि पनीर खाल्ल्याने इंजिनिअरिंगच्या 26 मुली आणि 3 मुलांची प्रकृती अचानक बिघडली. पिपरी येथील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी महाविद्यालयात वसतीगृहात राहतात.
वसतीगृहाच्या मेसमध्ये त्यांचे नियमित जेवण असते. पण अलीकडे भोजनाची तक्रार करत विद्यार्थ्यांनी भोजन चांगले मिळत नसल्याची बाब महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली होती. पण याकडे लक्ष दिले गेले नाही. मेसमधील भोजनात मंच्युरीयन आणि पनीरची भाजी देण्यात आली होती.
भोजनानंतर अकरा विद्यार्थिनींना मळमळ, उलट्या आणि पोट मुरडून येण्यासारख्या तक्रारी वाढल्या. लगेच विद्यार्थिनींना महाविद्यालय प्रशासनाने खाजगी रुग्णलयात दाखल केले. त्यांना सलाईन लावत उपचार करण्यात आले. तर काही विद्यार्थीनींना लगेच बरे वाटायला लागले. त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये प्रकृती अस्वस्थ झाल्याच्या कुरबुरी वाढल्या आणि त्यांच्यावरही उपचार करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उपचारांसह महाविद्यालयातील पाणी, जेवणाची तपासणी केली.
यादरम्यान महाविद्यालयात पालकांसह विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. इतकंच नव्हे, तर इंजिनिअरिंग महाविद्यालयातील वसतीगृहात मेसमध्ये शिळं अन्न दिलं जात असल्याचा आरोपही पालकांनी केला. दरम्यान, याप्रकरणी आता कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून, तूर्तास विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर यांनी दिली.