Parrot Maina Marriage: लग्न (Marriage) म्हटलं की, आपल्याकडे अत्यंत थाटामाटात केलं जातं. आपल्या लग्नाची चर्चा नातेवाईकांनी करावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मग यासाठी लग्नात सजावटीपासून ते जेवणापर्यंत कोणतीही कसर सोडली जात नाही. अनेक खिशात पैसा नसतानाही पाण्याप्रमाणे पैसा खर्च केला जातो. पण असंच मोठ्या थाटामाटात दोन पक्ष्यांचं लग्न झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का? नसेलच...पण मध्य प्रदेशात मात्र असंच एक लग्न पार पडलं आहे. येथे चक्क एक पोपट आणि मैना (Parrot Maina Marriage) रितसर पद्धतीने विवाहबंधनात अडकले आहेत.
मध्य प्रदेशातील पिपरिया गावात हे लग्न लागलं होतं. मंत्रोच्चार करत पारंपारिक पद्धतीन हे लग्न लावण्यात आलं. विशेष म्हणजे त्यांची पत्रिकाही जुळवण्यात आली होती.
पिपरिया गावात राहणारे रामस्वरुप परिहार यांनी मैनेला आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं आहे. दरम्यान, बादल लाल विश्वकर्मा यांच्याकडे पोपट आहे. दोघांनीही त्यांचा विवाह लावण्याचं ठरवलं.
रविवारी गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत पोपट आणि मैनाचं लग्न लावण्यात आलं. इतकंच नाही तर ढोल ताशे वाजवत वरातही काढण्यात आली. वरात काढली तेव्हा चारचाकीवर पोपटाचा पिंजरा ठेवण्यात आला होता. जेव्हा वरात रस्त्यावरुन जात होती तेव्हा लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
रामस्वरुप परिहार यांच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. हा विवाहसोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला.