करोना (Corona) काळात लॉकडाउन (Lockdown) लागलेल्या संपूर्ण देशच बंदिस्त झाला होता. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारांनीही लॉकडाउन जाहीर केले होते. करोनाची तीव्रता लक्षात घेता लोकांना घऱाबाहेर पडण्याचीही मुभा नव्हती. मात्र करोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर हे निर्बंध शिथील करण्यात आले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. मात्र गुरुग्राम (Gurugram) येथे एक महिला गेल्या तीन वर्षांपासून आपल्या अल्पवयीन मुलासह घरात बंदिस्त होती. करोनाच्या भीतीपोटी ती घराबाहेरच येत नव्हती. अखेर मंगळवारी अधिकाऱ्यांनी महिलेला बंदिस्त घऱातून बाहेर काढलं.
ही 33 वर्षीय महिला आपल्या अल्पवयीन मुलासह भाड्याच्या घऱात राहत होती. गुरुग्राममधील चक्करपूर भागात महिला वास्तव्यास होती. मंगळवारी पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि बालकल्याण विभागाचे सदस्य महिलेच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी दरवाजा तोडला आणि महिलेसह तिच्या 10 वर्षाच्या मुलाची सुटका केली. दोघांनाही तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
"महिलेची मानसिक स्थिती योग्य नाही. महिला आणि तिच्या मुलाला उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे," अशी माहिती सिव्हिल सर्जन डॉक्टर विरेंदर यादव यांनी दिली आहे.
मुनमून असं या महिलेचं नाव असून तिचा पती सुजन माझी याने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. सुजन हा एका खासगी कंपनीत इंजिनिअर आहे. त्याने चक्करपूर पोलीस ठाण्याचे उपरनिरीक्षक प्रवीण कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. 2020 मध्ये लॉकडाउन शिथील केल्यानंतर पती कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला असता, महिलेने नंतर त्यालाही घरात प्रवेश करु दिला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुजनने सुरुवातीचे काही दिवस आपले मित्र आणि नातेवाईकांकडे वास्तव्य केलं. नंतर त्याने त्याच परिसरात भाड्याने एक घर घेतलं.प त्नी आणि मुलाच्या संपर्कात राहण्यासाठी व्हिडिओ कॉल हा एकमेव मार्ग असल्याचे सुजन यांनी सांगितले. आपण घराचं भाडं, वीज बिल, मुलाच्या शाळेची फी भरत होतो. तसंच किराणा आणि भाजीपाला खरेदी करायचो आणि रेशनच्या पिशव्या दरवाजाबाहेर ठेवायचो असं त्यांनी सांगितलं आहे.
"सुरुवातीला माझा सुजन यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. पण नंतर त्यांनी मला व्हिडीओ कॉलवरुन पत्नी आणि मुलाशी बोलण्यास सांगितलं. महिले ज्या घरात राहत होती तिथे इतकी घाण झाली होती की अजून काही दिवस ते तिथे राहिले असते तर काहीतरी वाईट झालं असते," असं प्रवीण कुमार यांनी सांगितलं आहे.
महिलेच्या मुलाने गेल्या तीन वर्षात सूर्यही पाहिला नसल्याचं प्रवीण कुमार म्हणाले आहेत. इतकंच नाही तर तिने गॅस आणि साठवलेलं पाणीही करोनाच्या भीतीने वापरु दिलं नाही. दरम्यान पुन्हा एकदा पत्नी आणि मुलाची भेट झाल्याने सुजन यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.