Rajya Sabha : राज्यसभेत घोषणाबाजी महागात, खासदार संजय यांचं निलंबन

राज्यसभेत (Rajya Sabha) जोरदार घोषणाबाजी करणं आणि कागद फाडून सभापतींच्या दिशेने भिरकावणं खासदाराला चांगलंच महागात पडलंय. 

Updated: Jul 27, 2022, 06:38 PM IST
Rajya Sabha : राज्यसभेत घोषणाबाजी महागात, खासदार संजय यांचं निलंबन title=

नवी दिल्ली : राज्यसभेत (Rajya Sabha) जोरदार घोषणाबाजी करणं आणि कागद फाडून सभापतींच्या दिशेने भिरकावणं खासदाराला चांगलंच महागात पडलंय. या खासदाराचं एका आठवड्यासाठी निलंबन करण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Aap Mp Sanjay Singh) यांचं या आठवड्यातील उर्वरित कामकाजासाठी निलंबन केलं गेलं आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी ही माहिती दिली. (aam adami party rajya sabha mp sanjay singh suspended from house 1 week) 

उपसभापती काय म्हणाले?

उपसभापती हरिवंश यांनी मंगळवारी दुपारी संजय सिंह यांनी कामकाजावेळेस असभ्य वर्तन केल्याचं सांगितलं.  सिंग यांनी फक्त सभागृहाच्या नियमांचंच उल्लंघन केलं नाही, तर अध्यक्षांच्या निर्देशांचेही उल्लंघन केले, कागद फाडले आणि तेच तुकडे अध्यक्षांच्या दिशेने फेकले. सिंग यांचे वर्तन सदनाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे, असं हरिवंश म्हणाले.

नियम 256 लागू करण्याची घोषणा

हरिवंश यांनी सिंग यांच्याविरोधात नियम 256 लागू करण्याची घोषणा केली. हा नियम असभ्य वर्तनासाठी सदनातील सदस्याला निलंबित करण्याशी संबंधित आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी यासंदर्भात एक प्रस्ताव मांडला जो आवाजी मतदानाने सभागृहाने स्वीकारला.
 
यानंतर उपसभापतींनी सिंह यांना सदन सोडण्याचे निर्देश दिले. पण सिंह सदनातून बाहेर पडले नाहीत. त्यावर उपसभापतींनी 12 वाजून 3 मिनिटांनी कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केलं.