पतीने पत्नीवर सामूहिक बलात्कार होताना पाहिलं, आरोपींनी अंगावर डिझेल ओतून...; धक्कादायक घटनेने गाव हादरलं

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे पत्नीचं अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकमेव साक्षीदार असणाऱ्या पतीला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपड्यांच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 03:02 PM IST
पतीने पत्नीवर सामूहिक बलात्कार होताना पाहिलं, आरोपींनी अंगावर डिझेल ओतून...; धक्कादायक घटनेने गाव हादरलं title=

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मैनपुरी येथे पत्नीचं अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकमेव साक्षीदार असणाऱ्या पतीला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपड्यांच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली आहे. यानंतर मृत व्यक्तीच्या वडिलांनी आरोपींविरोधात हत्येची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सध्या जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसंच तपास केला जात आहे. 

मैनपुरीच्या बिछवा पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. येथो पोलिसांना एका शेताच्या शेजारी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा मृतदेह 40 वर्षीय साजिदचा असल्याचं उघड झालं होतं. नातेवाईकांनी कपड्यांच्या आधारे साजिदची ओळख पटवली होती. 

नातेवाईकांनी आरोप केला आहे की, साजिदच्या पत्नीचं अपहरण करण्यात आलं होतं. चार महिने तिला ओलीस ठेवत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात साजिद साक्षीदार होता. आरोपी त्याला कोर्टात साक्ष देऊ नये यासाठी धमकावत होते. त्याने नकार दिला असता अखेर हत्या करण्यात आली. 

मृताच्या नातेवाईकांनुसार, सामूहिक बलात्काराचे आरोपी भोला प्रधान आणि त्याची मुलं साजिदवर तडजोड करण्यासाठी दबाव टाकत होते. तसंच साक्ष दिल्यास जीव जाई गमवावा लागेल अशी धमकी देत होते. त्यांनी अनेकदा मारहाणही केली होती. अखेर त्यांनी त्याला सोबत नेऊन जिवंत जाळलं. त्याच्या अंगावर डिझेल टाकून जिवंत जाळून ठार करण्यात आलं. जाळण्यासाठी सुकं गवत आणि लाकडाचा वापर करण्यात आला. 

मैनपुरीच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे की, "बिछुआ क्षेत्रात एका व्यक्तीच्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपास केला होता. प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह साजिद नावाच्या व्यक्तीचा आहे. तो गाजियाबाद येथे काम करत होता. आम्ही सध्या नातेवाईकांशी बोलत आहोत. तपास सुरु आहे. लवकरच आरोपींना पकडलं जाईल".