BBC Documentary : गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटावरुन सरकार आक्रमक; केली मोठी कारवाई

BBC Documentary : बीबीसीच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या (India: The Modi Question) माहितीपटामध्ये गुजरात दंगलीच्या (Gujarat riots) वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Updated: Jan 22, 2023, 11:41 AM IST
BBC Documentary : गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटावरुन सरकार आक्रमक; केली मोठी कारवाई  title=
(फोटो सौजन्य - PTI)

BBC Documentary : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या (India: The Modi Question) माहितीपटावरुन सध्या मोठा वाद उफाळून आलाय. या माहितीपटात (BBC Documentary on PM Modi) गुजरात दंगलीच्या (Gujarat riots) वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या बदनामीचा हेतू असल्याचे म्हणत या डॉक्यूमेंट्रीवरून निवृत्त अधिकारी, माजी न्यायमूर्तीनी बीबीसीवर (BBC) जोरदार टीका केली आहे. या माहितीपटाच्या शेअरिंग लिंक्स  हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने शनिवारी यूट्यूब (YouTube) आणि ट्विटरला (Twitter) दिले आहेत. त्यामुळे आता सरकारने या डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित या माहितीपटाच्या मालिकेतील ट्विट आणि यूट्यूब लिंक व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश देताच त्याचे व्हिडिओ आणि लिंक्स हटवण्यास सुरुवात झाली आहे. यूट्यूब व्हिडिओंच्या लिंक असलेले 50 हून अधिक ट्विट ब्लॉक करण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे. 2021च्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कायद्यातील आपत्कालीन अधिकाराबाबतच्या तरतुदींचा वापर करून यूट्यूब  आणि ट्विटरला डॉक्यूमेंट्रीच्या लिंक्स हटवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांच्या वक्तव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी 19 जानेवारी रोजी यासंदर्भात एक पत्रकार परिषदही घेतली होती. यावेळी बोलताना बागची म्हणाले की, "आम्हाला वाटतं की हा प्रचाराचा भाग आहे. जो एका विशिष्ट कथनाखाली तयार झाला आहे. यात पूर्वग्रह, पक्षपात आणि वसाहतवादी मानसिकता स्पष्टपणे दिसून येते."

गुजरातचे मुख्यमंत्री होते पंतप्रधान मोदी

27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला आग लागून 59 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही गाडी कारसेवकांनी भरलेली होती. त्यानंतर पुढे काही दिवस गुजरातमधील विविध शहरांमध्ये दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये एक हजाराहून अधिक लोका मारले गेले होते. दंगलीनंतर राज्य सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, दंगल रोखण्यासाठी काहीही केले नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच फेटाळून लावला आहे. या प्रकरणी अनेक तपास यंत्रणांनी नरेंद्र मोदींना क्लीन चिटही दिली आहे.