नवी दिल्ली : सीबीआय या तपास यंत्रणेला भ्रष्टाचारानं कसं पोखरून काढलंय, याचं ढळढळीत उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय. सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकमेकांविरुद्ध ठसन सुरू आहे. सीबीआय म्हणजे देशातली सर्वात मोठी तपास यंत्रणा. केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांच्या अखत्यारीत सीबीआयचा कारभार येतो. त्यामुळे सीबीआय म्हणजे सरकारच्या हातातला पिंजऱ्यातला पोपट असल्याची टीका देखील वारंवार होते. मात्र आता या पिंजऱ्यातल्या दोघा मोठ्या पोपटांमध्येच भांडणं सुरू झाली आहेत.
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात सीबीआयनंच भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केलेत. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्यानंतरचे अस्थाना हे दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. कुख्यात मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याविरोधात सुरू असलेल्या तपासात दिलासा देण्यासाठी मध्यस्थामार्फत करोडो रूपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांच्याविरोधात आहे.
अस्थाना यांच्यासोबत उपअधीक्षक देवेंद्र कुमार, मनोज प्रसाद आणि सोमेश प्रसाद यांच्यावर देखील लाचखोरी आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीबीआयच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आलेत. विशेष म्हणजे सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि उपप्रमुख राकेश अस्थाना या दोघांनीही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत.
२ डिसेंबर २०१६ ला राकेश अस्थानांची सीबीआयच्या अंतरिम संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. ५ डिसेंबर २०१६ ला अॅडव्होकेट प्रशांत भूषण यांनी राकेश अस्थाना यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. १ फेब्रुवारी २०१७ ला आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली.
२४ ऑगस्ट २०१८ ला आलोक वर्मा यांनी एका उद्योगपतीकडून २ कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांनी थेट केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र पाठवून केला.
अस्थाना यांच्या या आरोपांची केंद्रीय दक्षता आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान सोमवारी सीबीआयनं एक विशेष प्रसिद्धीपत्रक जारी करून आलोक वर्मांविरोधातले आरोप प्रतिमा मलीन करण्यासाठी करण्यात आल्याचं म्हटलंय.
उल्लेखनीय बाब म्हणजे अस्थाना हे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. मोईन कुरेशी केससोबतच ऑगस्टा वेस्टलँड चॉपर खरेदी गैरव्यवहार तसंच फरार उद्योगपती विजय माल्या यांची कर्जबुडवेगिरीची प्रकरणं अशा महत्त्वाच्या खटल्यांचा तपास ते करतायत. एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
पंतप्रधानांचा लाडका अधिकारी, गुजरात कॅडरचा अधिकारी, गोध्रा एसआयटी फेम अधिकारी, सीबीआयमध्ये नंबर दोनच्या पदावर घुसखोरी करणारा अधिकारी, याला आता लाचखोरीप्रकरणी पकडण्यात आलंय. या पंतप्रधानांच्या अखत्यारीत, सीबीआयचा गैरवापर राजकीय सूड उगवण्यासाठी केला जातोय. आपापसात भांडत बसलेल्या सीबीआय यंत्रणेची पत पार खालावली आहे, असा भडीमार राहुल गांधींनी केलाय.
सीबीआयची प्रतिष्ठाच यामुळे पणाला लागली आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधला हा वाद आणखी किती टोकाला जाणार, आणि केंद्र सरकार त्यात कसा हस्तक्षेप करणार, याकडे आता सर्वाचं लक्ष लागलंय.