अॅमेझॉन (Amazon) ही ई-कॉमर्स वेबसाईट सातत्याने चर्चेत आहे. हिंदू (Hindu) देव देवतांच्या प्रतिमा असलेल्या उत्पादनांची अॅमेझॉनवर विक्री करण्यात येत असल्याने भारतीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावरुनच अॅमेझॉनवर टीका करण्यात येत होती. आता पुन्हा एकदा अॅमेझॉन चर्चेत आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) अॅमेझॉनवर गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या ऑर्गनायझर ( The Organiser) या मासिकाने ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये धर्मांतरासाठी (conversion) निधी पुरवल्याचा आरोप केला आहे. मासिकाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकाच्या मुखपृष्ठावर याच विषयावर आधारित चित्र छापण्यात आले आहे. "द अमेझिंग क्रॉस कनेक्शन" (Amazing Cross Connection) नावाच्या कव्हर स्टोरीमध्ये, मासिकाने हा आरोप केला आहे. अॅमेझॉन कंपनीचे "अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च" (ABM) म्हणून ओळखल्या जाणार्या संस्थेशी आर्थिक संबंध आहेत. या चर्च परिसरात कन्व्हर्जन मॉड्युल चालवत असल्याचा दावा मासिकाने केला आहे. मात्र, अॅमेझॉनने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
"ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च (ABM) द्वारे चालवल्या जाणार्या ख्रिश्चन कन्व्हर्जन मॉड्यूलला वित्तपुरवठा करत आहे. भारताच्या मोठ्या मिशनरी धर्मांतर मोहिमेला निधी देण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च द्वारे मनी लाँड्रिंग रिंग चालवण्याची शक्यता आहे," असे मासिकाने म्हटले आहे.
एबीएम भारतात ऑल इंडिया मिशन (एआयएम) नावाची संघटना चालवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. "ही त्यांची आघाडीची संघटना आहे जी त्यांच्या वेबसाइटवर उघडपणे दावा करते की त्यांनी ईशान्य भारतात 25,000 लोकांचे ख्रिश्चन धर्मात धर्मातर केले आहे. अॅमेझॉन भारतीयाने केलेल्या प्रत्येक खरेदीवर पैसे घेऊन संपूर्ण भारतात कन्व्हर्जन मॉड्यूलला समर्थन देत आहे," असा दावा मासिकाने केला आहे.