Amritpal Singh Arrest : 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला (Amritpal Singh) पंजाब पोलिसांनी (Punjab Police) ताब्यात घेतले. गेल्या महिनाभराहून अधिक काळ अमृतपाल फरार होता. पंजाबमधील मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर रविवारी अटक करण्यात आली आहे. खलिस्तानी (Khalistan) फुटीरतावादी अमृतपाल सिंग याला रविवारी आसामच्या (Assam) दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात (Dibrugarh Central Jail) हलवण्यात येणार आहे. अटकेच्या काही तास आधी अमृतपाल सिंग यांनी पंजाबमधील मोगा येथील रोडेवाल गुरुद्वारामध्ये भक्तांना संबोधित केले होते. गुरुद्वाराचे सिंह साहिब ग्यानी जसबीर सिंह रोडे यांनी दावा केला की अमृतपाल सिंह शनिवारी रात्रीच गुरुद्वारात पोहोचला होता. त्याने स्वत: पोलिसांना फोनवरून माहिती दिली आणि रविवारी सकाळी 7 वाजता आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले.
10 एप्रिल रोजी अमृतपालचा जवळचा सहकारी पापलप्रीत सिंग याला पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली होती. पापलप्रीत सिंगसोबत त्याच्या आठ साथीदारांनाही पंजाबपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आसामच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांना पंजाब किंवा दिल्लीच्या तुरुंगात ठेवण्याऐवजी आसाममध्ये हलवण्याचे मुख्य कारण म्हणजे फुटीरतावादी गटाशी परिचित असलेले इतर गुंड आधीच त्या तुरुंगांमध्ये आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 1859-60 मध्ये बांधलेले दिब्रुगड कारागृह हे सर्वात सुरक्षित कारागृह आहे. दिब्रुगड कारागृह हे ईशान्येतील सर्वात जुने तुरुंग आहे. तसेच युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम-इंडिपेंडंट (ULFA-I) च्या अनेक प्रमुख नेत्यांना ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. अमृतपालचे काका, माध्यम सल्लागार यांच्यासह पापलप्रीत सिंग, दलजित सिंग कलसी, भगवंत सिंग उर्फ बजेके, गुरमीत सिंग बुक्कनवाल, बसंत सिंग दौलतपुरा, हरजित सिंग, वरिंदर सिंग उर्फ फौजी, वरिंदर सिंग आणि गुरिंदर पाल सिंग हे आसामच्या मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत.
तगडी सुरक्षा व्यवस्था
दुसरीकडे, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी यापूर्वी सांगितले होते की, अमृतपालच्या सहकाऱ्यांची डिब्रुगढ तुरुंगात बदली करणे हा पोलिसांच्या कामाचा भाग होता. दरम्यान, दिब्रुगढ तुरुंगात आता खलिस्तानी समर्थक आल्याने तिथल्या परिसरात आणि आजूबाजूची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अमृतपालचे सहकारी ज्या सेलमध्ये आहेत त्या सेलसाठी सुरक्षेचे मोठं कडे तयार करण्यात आले आहे. या तुरुंगात सीआरपीएफचे जवान चोवीस तास पहारा देत आहेत. यासोबत तुरुंगात आसाम पोलिसांचे कमांडोही आहेत. 57 सीसीटीव्ही कॅमेरे आतील कैद्यांवर आणि कारागृहाच्या गेटवर येणाऱ्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.