मुंबई : AAP On Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निडवणुकीत 10 वर्षांच्या आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर आपचे सर्वेसर्वा दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, 'आम आदमी'ला आव्हान देऊ नका! पंजाबचा निकाल हा सर्वात मोठा इन्कलाब आहे. पंजाबमध्ये दिग्गजांच्या खुर्च्या हलल्या आहेत. पंजाबच्या जनतेने कमाल केली, असे गौरवोद्गार केजरीवाल यांनी काढत पंजाबच्या जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत आप नेते मनीष सिसोदिया होते.
अरविंद केजरीवाल म्हणाले, पंजाबमध्ये मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. पंजाब वालो तुस्सी कमाल कर दित्ता. भगतसिंह यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला जाणूनबुजून गरीब ठेवले. आता ते शक्य नाही. 'आप'ने बदल सुरु केला आहे. काँग्रेस आणि अकाली दलसह भाजपचा धुव्वा उडाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला भाजप पर्याय उभा राहू शकतो हे सूत्र अयशस्वी ठरले आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर बाहेरचे लोक पंजाबवर राज्य करणार का? दहशतवादी आणि देशद्रोही पंजाबमध्ये चालतील का, असा निवडणुकीआधी प्रचार विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी हे आरोप विजयानंतर खोडून काढले आहे.दहशतवादी मी नव्हे, देश लुटणारे दहशतवादी तुम्ही आहात, असे सडेतोड उत्तर केजरीवाल यांनी विरोधकांना दिले. विरोधकांनी कजेरीवाल यांना दहशतवादी म्हटले होते. आता केजरीवाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
'आप'ने विकासाला प्राधान्य दिले आहे. आधी दिल्ली, आता पंजाब आणि मग संपूर्ण देश इन्कलाब होणार. आम आदमीला आव्हान देऊ नका, असे म्हटले. यावेळी केजरीवाल यांनी भारत माता की जय आणि इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी महिलांना आम आदमी पक्षात येण्याचे आवाहन केले.