अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) शुक्रवारपासून एक तासासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्या राम मंदिराच्या मुख्य पूजाऱ्यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रामलल्ला फक्त पाच वर्षांचा असून तो सतत 18 तास (दर्शन देण्याचं) ताण घेऊ शकत नाही असं पूजाऱ्यांचं म्हणणं आहे.
अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यामुळे मंदिर व्यवस्थापनाने दर्शनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. भाविकांना पहाटे 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत रामलल्लाचं दर्शन दिलं जात आहे. तसंच 23 जानेवारीपासून रोज पहाटे 4 वाजता आरती केली जात आहे. यानंतर सकाळी 6 वाजता सुरु झालेलं दर्शन रात्री 10 वाजेपर्यंत सुरु असतं. त्यानंतर 2 तासांचे विधी होतात.
आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितलं आहे की, "श्री रामलल्ला फक्त 5 वर्षांचा एक लहान बालक आहे. तो सतत 18 तासांचा सलग ताण घेऊ शकत नाही. त्यामुळे रामलल्लाला थोडी विश्रांती देण्याच्या हेतूने मंदिर दुपारी 12.30 ते 1.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन रामलल्लाला काही वेळासाठी विश्रांती मिळेल". अभिषेक सोहळ्यापूर्वी, दर्शनाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 अशी होती, ज्यामध्ये दुपारी 1:30 ते 3:30 या दोन तासांच्या विश्रांतीचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमाला देशभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. राजकारण्यांसह उद्योग जगतापासून ते मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना हा सोहळा याची देही, याची डोळा अनुभवला. प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. लाखो लोकांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. यामुळे मंदिर व्यवस्थापनाचाही गोंधळ उडाला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात पूजा केली. आपचे दोन्ही नेते आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी रामजन्मभूमी मंदिरात सुमारे एक तास 15 मिनिटे घालवली. केजरीवाल यांना 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपण नंतर कुटुंबासह जाणार अस्याचं सांगितलं होतं.