Bangladesh Violence Big Blow For India: भारताला सख्खा शेजारी असलेल्या बांगलादेशमधील राजकीय घडामोडींमुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचं टेन्शनही वाढलं आहे. भारताला अधिक चिंतेत टाकणारी बाब म्हणजे भविष्यामध्ये भारताच्या पूर्वेकडील हा देश केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारबरोबरच संपूर्ण देशाची डोकेदुखी वाढवू शकतो. भारताबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावं लागल्यानंतर त्या भारतामध्ये आश्रयासाठी आल्या आहेत. शेख हसीना या पुढे लंडनला रवाना होतील आणि पुन्हा कधीच सक्रीय राजकारणात येणार नाहीत अशी दाट शक्यता असल्याचं सांगितलं जात असतानाच शेख हसीना यांची जागा घेणारी संभाव्य महिला नेता ही भारतासाठी अधिक धोकादायक ठरु शकते, असं सांगितलं जात आहे. भारताचं टेन्शन का वाढलं आहे? भारताचं टेन्शन वाढवणारी आणि भारताबरोबरच्या संबंधांसंदर्भात कायमच 'भांडखोर' राहिलेली ही महिला कशाप्रकारे अडचणीची ठरु शकते पाहूयात...
शेख हसीना यांनी बंगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देणं हा भारतासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. 2009 पासून सत्तेत असलेल्या शेख हसीना यांचा सध्या पंतप्रधान पदाचा चौथा कार्यकाळ सुरु होता. मात्र अचानक देशात उसळलेल्या हिंसाचारामुळे आणि तो हाताळण्यात अपयश आल्यामुळे शेख हसीना यांनी जीव मुठीत धरुन भारतात पळून यावं लागलं. मात्र शेख हसीना पायउतार झाल्यानंतर त्यांची जागा खालिदा जिया या माजी पंतप्रधान घेणार असल्याची चर्चा आहे. 78 वर्षीय खालिदा जिया बांगलादेशच्या पंतप्रधान होणं भारतासाठी फार धोक्याचं ठरु शकतं. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख असलेल्या खालिदा जिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. मात्र त्यांची विचारसणी आणि एकंदरितच कल हा कायमच पाकिस्तानच्या बाजूने राहिला आहे. खालिदा जिया या पाकिस्तान आणि चीन धार्जिण्या म्हणून (कु)प्रसिद्ध आहेत.
खालिदा जिया या 2001 ते 2006 दरम्यान आणि त्यापूर्वीही 1991 साली पंतप्रधान होत्या तेव्हा भारत आणि बांगलादेशमध्ये वाद निर्माण झाले होते. त्यांच्या काळात दोन्ही देशांचे संबंध फारसे चांगले नव्हते. परराष्ट्र संबंधांसंदर्भातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, खालिदा जिया या पाकिस्तानी धार्जिण्या नेत्या आहेत. खालिदा जिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष हा कट्टरतावाद्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. ही गोष्ट भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते.
नक्की वाचा >> 17 वर्षांचा तुरुंगवास झालेल्या महिलेच्या हाती जाणार बांगलादेश? Khaleda Zia आहे तरी कोण?
'फर्स्ट पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधले मनीश दाभाडे यांनी, "खालिदा जिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष आणि जमात-ए-इस्लामी हे दोघेही कट्टरतावादी संघटना असून त्या भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतात. बांगलादेशमध्ये सध्या सुरु असलेली आंदोलनं या दोन्ही संघटनांनी हळूहळू करत आपल्या हेतूसाठी ताब्यात घेतली. भविष्यात या दोन्ही संघटनांपैकी कोणाचाही समावेश असलेलं सरकार बांगलादेशमध्ये सत्तेत आल्यास ती भारतासाठी डोकेदुखीच ठरणार आहे. कारण या दोन्ही संघटना पाकिस्तान आणि चीन धार्जिण्या आहेत," असं सांगितलं.