१ जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल, आत्ताच जाणून घ्या

१ जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

Updated: Jun 25, 2020, 04:13 PM IST
१ जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल, आत्ताच जाणून घ्या title=

मुंबई : १ जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बँकांची खाती गोठवण्यापासून ते एटीएम शुल्क वाढवण्यापर्यंतचा समावेश आहे. १ जुलैपासून नेमके कोणते नियम बदलले जाणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात.

बँक खाते गोठवणार

बँक ऑफ बडोदाने त्यांच्या ग्राहकांना केवायसी उपलब्ध करून द्यायचा एसएमएस पाठवला आहे. ग्राहकांनी त्यांचा केवायसी बँकेला दिला नाही, तर १ जुलैपासून अशी खाती गोठवण्यात येतील. केवायसीसाठी ग्राहकांना बँकेला आधारकार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्डची माहिती द्यावी लागणार आहे. 

पीएनबी बँकेच्या व्याजदरात कपात

देशातली दुसरी सगळ्यात मोठी बँक असलेल्या पीएनबीने त्यांच्या बचत खात्याच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून सगळ्या बचत खात्यांच्या व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. १ जुलैपासून ग्राहकांना ३.२५ टक्के एवढाच व्याजदर मिळेल.

एटीएममधून मिळणारी सूट संपणार 

लॉकडाऊनदरम्यान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क लावणं थांबवलं होतं. १ जुलैपासून मात्र पुन्हा एकदा एटीएममधून पैसे काढल्यावर ग्राहकांना शुल्क भरावं लागणार आहे. केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत कोणत्याही एटीएममधून १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासाठीचं शुल्क हटवलं होतं. 

कमीत कमी रक्कम ठेवण्याचा नियम शिथिल

१ जुलैपासून खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवल्यास आकारण्यात येणारी दंडाची रक्कम आकारली जाणार नाही. म्हणजेच आता ग्राहकांना बँक खात्यांमध्ये कमीत कमी रक्कम ठेवणं गरजेचं नसेल.