Bank of Baroda : विविध खासगी आणि सार्वजनिक बँकांकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. ठेवीदारांची खाती, गुंतवणूकदारांसाठीची नियमावली, सेवा या आणि अशा तत्सम निकषांवर या नियमांची आखणी होते. अनेकदा भारतातील बँकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या आरबीआय अर्थात (Reserve Bank of India) रिझर्व्ह बँकेकडूनही बँकांना वेळोवेळी सूचना केल्या जातात. या साऱ्याचे परिणाम खातेधारकांवर होतात.
बँक ऑफ बडोदाच्या खातेधारकांना सध्या अशाच काही परिणामांना सामोरं जावं लागत आहे. त्यातही तुम्ही बँक ऑफ बडोदाचं मोबाईल अॅप वापरत असाल तर ही अडचण आणखी वाढणार आहे. कारण, आरबीायकडून बीओबीचं अॅप ‘बॉब वर्ल्ड’ वर नव्या ग्राहकांच्या नोंदणीवर तात्काळ प्रभावाअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. थोडक्यात आता तुम्ही अॅपच्या माध्यमातून बँकेच्या सेवांचा उपभोग घेऊ शकणार नाही.
RBI नं दिलेल्या माहितीनुसार बीओबीच्या अॅपवर ही कारवाई ग्रहकांची अॅपमध्ये नोंदणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या काही अडचणींना अधोरेखित करण्यात आल्यानंतर केली गेली. दरम्यान, जुन्या ग्राहक/ खातेधारकांवर मात्र याचा फारसा परिणाम होणार नाहीये.
बँक ऑफ बडोदाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार आरबीआयनं अॅपसंबंधीच्या तक्रारी दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. किंबहुना या तक्रारी दूर करण्यासाठी आता तातडीनं काही पावलंही उचलली जाताना दिसत आहेत.
एकिकडे आरबीआयची कारवाई होत असताना दुसरीकडे BoB वर्ल्ड मोबाइल अॅप मात्र सुरळीत सुरु राहणार आहे. त्याशिवाय नेट बँकिंग, व्हॉट्सअप बँकिंग, डेबिट कार्ड, एटीएम या सेवाही पूर्ववत सुरुच राहणार आहेत.
तुम्ही नव्यानं बीओबीचं अॅप सुरु करण्याच्या विचारात असाल, तर सर्वप्रथम या तक्रारी निवारण होण्याची प्रतीक्षा तुम्हाला करावी लागणार आहे. जर, तुमच्याकडे आधीपासूनच हे अॅप असेल तर मात्र कोणत्याही अडचणीशिवायच तुम्हाला हे अॅप वापरता येणार आहे.