मुंबई : Beer price hike | देशातील पेट्रोल-डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींचा फटका सर्वांनाच बसत आहे. आता बिअरप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे कारण लवकरच बिअरच्या किमती वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आता बिअरच्या किमतीही वाढवल्या जाऊ शकतात, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. यासोबतच उन्हाळी हंगामात बिअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अशा परिस्थितीत कंपन्या किंमत वाढवण्याचा विचार करत आहेत.
एका इंग्रजी न्यूज वेबसाईटनुसार, कंपन्यांचे म्हणणे आहे की बीयर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या बार्लीची(barley) किंमत तीन महिन्यांत दुप्पट झाली आहे. यासोबतच बॉटलिंग कंपन्यांनीही दरात 30 टक्क्यांनी वाढ केली आहे. एवढेच नाही तर लेबलपासून ते बॉक्सपर्यंतच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा स्थितीत बिअरच्या किमती वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव आहे.
युनायटेड ब्रुअरीजचे सीईओ ऋषी परदल म्हणाले की, कंपनी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक शहरांमध्ये बिअरच्या किमती वाढवणार आहे. ग्राहकांवर जास्त बोजा पडू नये म्हणून दरात वाढ योग्य पद्धतीने केली जाईल, असे ते म्हणाले. यूबी कंपनी हेनेकेन आणि किंगफिशर ब्रँड अंतर्गत बिअर बनवते. यापूर्वी कंपनीने बीरा 91 ब्रँडच्या किमती वाढवल्या आहेत.
दिवान्स मॉडर्न ब्रुअरीजचे एमडी प्रेम दिवाण म्हणाले की, वाढत्या खर्चामुळे कंपनीवरील बोजा वाढला आहे आणि अशा परिस्थितीत आमच्यासमोर दोन पर्याय आहेत. कंपनीने एकतर बिअरच्या किमती वाढवाव्यात किंवा त्यावरील सवलत रद्द करावी. दिवान्स कंपनी गॉडफादर, सिक्स फील्ड्स, कोट्सबर्ग या लोकप्रिय ब्रँडची बिअर बनवते.
देशातील दारूच्या किमतींवर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. यासोबतच राज्यांना त्याच्या विक्रीतून मोठा महसूल मिळतो. त्यामुळेच दिल्लीसारख्या राज्यात दारूच्या दुकानांची संख्या वाढली असून त्यांचे परवाने देऊन सरकार कमाईही करते.