Bhopal Man Wife Piles Case In Court: मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये पत्नीला मूळव्याध असल्याने विभक्त व्हायचं आहे असं म्हटलं आहे. भोपाळमधील जिल्हा कौटुंबिक कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या या दांपत्याचं समोपदेशन केलं जात आहे. सदर प्रकरणामध्ये याचिका दाखल करणारा 30 वर्षीय पती एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. मागील वर्षी त्याचं लग्न झालं. लग्नानंतर एका महिन्याने या दोघांनी शरीरसंबंध ठेवताना केलेल्या अनैसर्गिक कृत्यामुळे महिलेला मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला.
मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्याने या दांपत्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. चाचण्यांदरम्यान या महिलेला मूळव्याध असल्याचं स्पष्ट झालं. मात्र हे समजल्यानंतर पत्नीला समजून घेण्याऐवजी आणि इलाजासंदर्भात चर्चा करण्याऐवजी हा पती पत्नीवरच संतापला. पत्नीला मूळाव्याधीचा त्रास असल्याचं तिने तसेच तिच्या कुटुंबियांनी आपल्यापासून लपवून ठेवण्याने हा तरुणा चांगलाच संतापला. मात्र आपल्याला अशी काही व्याधी आहे याची कल्पना अजिबात नव्हती असं या महिलेचं म्हणणं आहे. तिने पतीला हे समजावून सांगण्याचा बराच प्रयत्न केला. आपल्यालाच या समस्येसंदर्भात डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर आणि चाचण्यांचे निकाल समोर आल्यानंतर समजल्याचं या महिलेने पतीला पटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र हे प्रयत्न व्यर्थ गेले.
आपल्या पत्नीने आणि तिच्या घरच्यांनी तिच्या या व्याधीसंदर्भात आपल्याला लग्नापूर्वी कल्पना दिली नाही. आपली जाणूनबुजून फसवणूक करण्यात आली, असं या पतीचं म्हणणं आहे. पत्नी हा प्रकार समोर आल्यापासून पतीला असं काहीही नसून गैरसमज करुन न घेण्यासंदर्भात विनवणी करत आहे. मात्र तिचा पती काहीही ऐकून घेण्यास तयार नाही. या तरुणीने पत्नीला असलेल्या मूळव्याधीच्या समस्येसंदर्भात आपल्या कुटुंबियांनाही सांगितलं. पतीचे कुटुंबीयही महिलेला टोमणे मारु लागले आणि तिचा छळ करु लागले. लग्नापूर्वी मुद्दाम या समस्येसंदर्भात आपल्याला कल्पना दिली नाही असं आता या महिलेच्या पतीबरोबर तिच्या घरच्यांचेही म्हणणे होते. मात्र पती केवळ महिलेचा मानसिक छळ करुन थांबला नाही तर त्याने या कारणासाठी थेट कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे.
कौटुंबिक न्यायालयातील समोपदेशक सिंधू ढोलपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समोपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. 'मूळव्याध ही काही गंभीर समस्या नाही मी हे या तरुणाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. ही समस्या कोणालाही होऊ शकते आणि त्यावर इलाजही शक्य आहे, असं त्याला सांगितलं,' अशी माहिती सिंधू यांनी दिली. पत्नीला मूळव्याध असल्याने घटस्फोट मिळणं कठीण असून या कारणासाठी कोर्ट विभक्त होण्याची परवानगी देण्याची शक्यता कमी असल्याचंही पतीला समोपदेशकांनी सांगितलं असून त्याऐवजी पत्नीवर उपचार करण्याचा सल्ला दिला. कोर्टातील खटल्यावर खर्च होणारा पैसा उपचारासाठी खर्च करण्याचा सल्ला समोपदेशकांनी दिला असून दुसऱ्या फेरीतील समोपदेशनासाठी या दोघांना बोलवण्यात आलं आहे.