मुंबई : कर्नाटकातल्या हुलिकल गावातली ही थिमाक्का. शिक्षण असं काहीच नाही. वयात आल्यावर तिचं चिकय्याशी लग्न झालं. दोघंही शेतात काम करायचे. थिमाक्काला मूल होत नाही म्हणून सासरच्यांनी जाच सुरू केला. पण नव-यानं थिम्माकाला साथ दिली आणि दोघांनीही घर सोडलं.
दोघांनीही व्रत घेतलं पर्यावरणाचं. दोघंही वडाची झाडं लावायला लागले. वडाच्या बिया गोळा करायच्या आणि त्या चार चार किलोमीटरच्या अंतरानं लावत जायची. दोघांचाही हाच दिनक्रम. चार चार किलोमीटर पाणी उचलून घेऊन चालत जायचं आणि वडाला पाणी घालायचं. स्वतःच्या मुलांसारखं वडाच्या झाडांवर प्रेम आणि काळजी घेतली. पाहता पाहता दोघांनी 384 झाडं लावली.
जनावरांनी या झाडांचं नुकसान करु नये, म्हणून वडांच्या झाडांभोवती काटेरी कुंपणही घातलं जायचं. पावसाळ्याच्या आधी झाडं लावली जायची. हुलिकल ते कुरुड या SH94 या मार्गावर अशी ही वडाच्या झाडांची रांगच्या रांग तयार झाली. आता या वडाच्या झाडांची संख्या तब्बल 8 हजार झालीय.
थिमाक्कानं लावलेल्या या झाडांचं जंगल झालंय. आता या झाडांची काळजी कर्नाटक सरकार घेतं. थिमाक्काच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्थांनी घेतली. बीबीसीनं थिमाक्काचं नाव जगातल्या सगळ्यात प्रभावशाली महिलांमध्ये नोंदवलं.. थिमाक्का सालुमर्दा थिमाक्का या नावानं ओळखली जाऊ लागली. सालुमर्दा म्हणजे कन्नड भाषेत झाडांची रांग.
कन्नड जनतेनं थिमाक्काला सालुमर्दा ही उपाधी दिली. अनेक देशांमधल्या पर्यावरण संस्थांमध्ये थिम्माकाच्या नावानं धडे शिकवले जातात. ती आता पर्यावरणाच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणी असते. थिमाक्कानं लावलेल्या वडाच्या झाडांची संख्या आता 8 हजार झालीय. त्यामुळे 8 हजार मुलांची आई म्हणूनच 105 वर्षांच्या या थिमाक्काला ओळखलं जातं. तिनं लावलेले वटवृक्ष रोज लाखो लोकांना सावली देतायत आणि भरभरुन ऑक्सिजनही देतायत.