Viral Video : लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा भिक्षुक किंवा तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. पैसे मागण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे रेल्वे प्रवासी त्यांना पैसे देऊन त्यांच्यापासून सुटका करुन घेतात. मात्र काही तृतीयपंथी हे पैसे मागताना इतकी अरेरावी करतात की लोकांना संताप अनावर होतो. अनेकवेळा प्रवासी त्यांची तक्रार करतात आणि रेल्वे पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. काहीवेळा यांची हिमंत इतकी वाढलेली असते की ते प्रवाशांना मारहाण देखील करतात.
अशाच एक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशाच एका व्हिडीओमध्ये काही तृतीयपंथी प्रवाशाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. याची रेल्वे प्रशासनाला सुरुवातीला तक्रार करताच त्यांनी दिलेल्या उत्तराने प्रवाशांनी डोक्याला हात लावला आहे. मात्र त्यानंतर या तृतीयपंथियांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांकडून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
बिहारच्या कटिहार-पाटणा इंटरसिटी गाडीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तृतीयपंथी चढले आणि प्रवाशांकडून पैसे मागू लागले. काही प्रवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीच्या रात्री @aazadrajeev नावाच्या सोशल मीडिया युजरच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता.
काय म्हटलंय पोस्टमध्ये?
यह वीडियो 15713 कटिहार-पटना इंटरसिटी का है। ट्रेन में खगड़िया से किन्नरों का जत्था चढ़ा और यात्रियों से जबरदस्ती पैसा वसूलने लगा। उमेशनगर और एसकमाल के बीच पैसा नहीं देने वाले यात्रियों की इन किन्नरों ने बेहरमी से पिटाई कर दी। यात्रियों की कोई सुध लेने वाला नहीं है, सब रामभरोसे. pic.twitter.com/J1bkX7Bo0m
— आजाद राजीव (@aazadrajeev) February 24, 2024
"हा व्हिडिओ 15713 कटिहार-पाटणा इंटरसिटीचा आहे. खगरिया येथून तृतीयपंथीयांचा एक गट ट्रेनमध्ये चढला आणि प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करू लागला. उमेशनगर ते इसकमळ दरम्यान पैसे न देणाऱ्या प्रवाशांना या तृतीयपंथीयांनी बेदम मारहाण केली. प्रवाशांची काळजी घेणारे कोणी नाही. इथे सर्व रामभरोसे आहे," असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Kindly look into the matter. @drmsee1
— DRM/DNR(Danapur) (@drmdnr) February 25, 2024
रेल्वे प्रशासनाने दिलं धक्कादायक उत्तर
25 फेब्रुवारी रोजी सकाळी, दानापूर डिवीजनने या प्रकरणाची दखल घेतली आणि सोनपूर डिवीजनला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. त्यानंतर सोनपूर डिवीजनने हे प्रकरण आरपीएफकडे पाठवले. आरपीएफने ही ट्रेन डीएनआर डिवीजन टीटीई चालवत असल्याचे सांगून त्यांनी याप्रकरणाची दखल घ्यावी असे सांगण्यात आले. सुमारे 22 तास सोशल मीडियावर रेल्वे अधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी तृतियपंथीयांना अटक केली.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
याप्रकरणी एका युजरने, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना तिकिटापेक्षा तृतीयपंथीयांना जास्त पैसे द्यावे लागतात आणि पैसे न दिल्यास अपमान आणि मारहाण सहन करावी लागते, असे म्हटलं आहे. आणखी एका युजरने, रेल्वे पोलीस दलाला कठोर आदेश दिल्याशिवाय ट्रेनमधील तृतीयपंथीयांची दहशत थांबवता येणार नाही. कृपया हे थांबवा, असे म्हटलं आहे. दुसऱ्या एकाने, हे रेल्वेचे लोक एकमेकांवर ढकलत आहेत. तोपर्यंत ट्रेन शेवटच्या थांब्यावर पोहोचली असेल आणि तृतीयपंथी आपापल्या घरी गेले असतील, असे म्हटलं आहे.