Eggs Tomatoes Hurl On Congress Leader: तेलंगणमधील (Telangana) भूपालपल्ली शहरामध्ये मंगळवारी रात्री एका राजकीय घडामोडीमुळे तणाव निर्माण झाला होता. बीआरएस समर्थकांनी काँग्रेसच्या एका नेत्याचं भाषण सुरु असतानाच त्यांच्यावर अंडी आणि टोमॅटो फेकून मारली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांच्यावर सार्वजनिक सभेत करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच तणाव निर्माम झाला. रेवंत रेड्डी हे 'हाथ रे हाथ जोडो यात्रे'मध्ये सहभागी झाले होते. याच यात्रेदरम्यानच्या एका कार्यक्रमात ते समर्थकांसमोर भाषण देत होते. या हल्ल्यानंतरही रेवंत रेड्डींनी आपलं भाषण सुरु ठेवत हा हल्ला भारत राष्ट्र समितीने घडवून आणल्याचा आरोप केला. भारत राष्ट्र समिती हा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर भाषणादरम्यान झालेल्या या हल्ल्यानंतर बीआरएस आणि काँग्रेस समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. या मारहाणामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. रेवंत रेड्डींचं भाषण सुरु असतानाच गर्दीमधील बीआरएस समर्थकांना रेड्डींविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर त्यांनी मंचाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अडवण्यात आलं. पोलिसांनी या बीआरएस समर्थकांना जवळच्या चित्रपटगृहामध्ये नेलं तिथेच स्थानबद्ध केलं.
मात्र बीआरएस समर्थकांची संख्या मोठी होती. पोलिसांना सर्वांवर नियंत्रण मिळवण्याआधी काही बीआरएस समर्थकांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या दिशेने अंडी आणि टोमॅटो फेकली. सुरक्षारक्षकांनी रेवंत रेड्डी यांच्या भोवती मानवी कडं निर्माण केलं. रेवंत रेड्डींसमोर एक कापड पकडून त्यांना अंडी आणि टोमॅटो लागणार नाही असा सुरक्षारक्षकांचा प्रयत्न होता. काँग्रेसच्या समर्थकांनी बीआरएसच्या समर्थकांना डांबून ठेवलेल्या चित्रपटगृहावर दगडफेक केली. यावेळेस काँग्रेस समर्थकांनी रिकाम्या काचेच्या बाटल्याही या चित्रपटगृहावर फेकल्या.
10 मिनिटं या दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये दगडफेक सुरु होती. या हल्ल्यामध्ये चित्रपटगृहाच्या खिडकीच्या काचा फुटल्या. या हल्ल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला. सभा संपल्यानंतर येथील परिस्थिती नियंत्रणात आली. रेवंत रेड्डी आपलं भाषण संपल्यानंतर कार्यक्रम स्थळावरुन निघून गेल्यानंतर तणाव शांत झाला.
BRS activists attacked @revanth_anumula with tomato eggs in Bhupalapalli Sabha...
This attack is a proof of your arrogance, Congress is not afraid of this, it is the end of your dictatorial rule in Telangana.#HathSeHathJodo
#YatraForChange pic.twitter.com/0zwQxZuioX— Bhadradri Kothagudem Congress Sevadal (@SevadalBHK) February 28, 2023
रेवंत रेड्डी यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करताना, "बीआरएसच्या गुंडांनी माझ्या भूपालपल्लीमधील सभेवर दगडफेक केली. ही सभा पांगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र आम्ही काँग्रेसचे सैनिक आहोत. आम्ही कोणाला घाबरत नाही. यात्रा फॉर चेंजला केवळ 16 दिवस झाले आहेत आणि बीआरएस पक्षाला वाटत असणारी आपली भिती तुम्ही या माध्यमातून पाहू शकता," असा टोला लगावला आहे.