Business News: उद्योग जगतामध्ये भारतातील काही कुटुंबांची नावं आवर्जून घेतली जातात. याच नावांच्या यादीत आता नव्या पिढीचीही सरशी पाहायला मिळत आहे. बहुतेक उद्योजकांची मुलं सध्या त्यांचा वारसा पुढे नेताना दिसत आहेत. जगभरात आणि आशिया खंडात आपल्या श्रीमंतीमुळं चर्चेत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्यासह त्यांची मुलंसुद्धा उद्योगजगतामध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्वं निर्माण करत आहेत. याच अंबानीपुत्रांना आणि विशेष म्हणजे ईशा अंबानीला आता 30 वर्षीय तरुणी चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.
वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी या तरुणीच्या संपत्तीचा एकूण आकडा साधारण पावणेदोन लाख कोटींच्या घरात आहे. कलाजगतापासून वेगळं झाल्यानंतर या तरुणीनं आता व्यवसाय क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. ब्यूटी, कॉस्मेटीक सेक्शनमध्ये प्रगतीपथावर वाटचाल करणारी ही तरुणी दुसरीतिसरी कोणी नसून ती आहे कुमार मंगलम बिर्ला यांची लेक अनन्या बिर्ला. अनन्या आता ब्यूटी आणि पर्सनल केअर क्षेत्रात एक नवा ब्रँड लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी यांनी 40 अंडर 40 या यादीत समाविष्ट असणाऱ्या अनन्याचा गौरव केला होता. वडिलांच्या उद्योगाला पुढे नेण्यासमवेत अनन्या तिची वेगळी ओळख तयार करत आहे. Svatantra Microfin या कंपनीची ती संस्थापिका आहे. याशिवाय ती एमपॉवरचीसुद्धा संस्थापिका आहे.
कलाक्षेत्रात कधीकाळी अनन्या बरीच सक्रिय होती. पण, अखेर तिनं व्यवसायाचीच वाट निवडली. फोर्ब्सच्या माहितीनुसार कुमार मंगलम बिर्ला यांच्या एकूण संपत्तीचा आकडा 21.4 बिलियन डॉलर इतका असून, जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत त्यांना 92 वं स्थान मिळालं आहे. भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते 7 व्या स्थानावर आहेत.
युके इथं तिनं अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनाचं शिक्षम घेतलं आहे. व्यवसाय क्षेत्रात ती कुटुंबाची जबाबदारी पुढे नेत आदित्य बिर्ला ग्रुप कंपनीच्या ग्रासिम इंडस्ट्रीज (Grasim Industries) मध्ये संचालिका म्हणून काम पाहते. वडिलांकडे गडगंज श्रीमंती असतानाच अनन्याचा श्रीमंतीचा आकडाही थक्क करणारा आहे.
एका प्रसिद्ध वेबसाईटच्या वृत्तानुसार अनन्याकडे वयाच्या 30 व्या वर्षी तब्बल 1,77,864 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. संपत्तीच्या या आकड्यासह अनन्यानं ईशा अंबानीवरही मात केली आहे. ईशाची एकूण संपत्ती 835 कोटी रुपये इतरकरी असल्यानं या दोन्ही आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे हे स्पष्ट.