Physical Relationship With Dead Body:: मृत शरीराशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या गुन्ह्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. हत्या आणि नंतर मृतदेहाशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. हत्येनंतर महिलेशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरूषाला उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. त्याला हत्येसाठी शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतलाय. भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत, नेक्रोफिलिया म्हणजेच मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा मानला जात नाही.
कर्नाटक उच्च न्यायालयाने एका व्यक्तीची हत्या करून नंतर त्याच्या मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल दोषीला शिक्षा सुनावली होती. पण आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती हसनुद्दीन अमानतुल्ला आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या प्रकरणात कर्नाटक सरकारकडून अतिरिक्त महाधिवक्ता अमन पनवार यांनी बाजू मांडत युक्तिवाद केला. आयपीसीच्या कलम 375(क) अंतर्गत 'बॉडी' हा शब्द मृतदेहाचा एक भाग मानला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
महिलेच्या संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच्या श्रेणीत येते. त्याचप्रमाणे एक मृतदेह देखील हे होऊ देत नाही. अशा परिस्थितीत हेदेखील बलात्काराच्या श्रेणीत आले पाहिजे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. भारतीय दंड संहितेनुसार नेक्रोफिलिया (मृतदेह) हा गुन्हा नाही, असे म्हंटल्याची माहिती जनरल अमन पनवार यांनी दिली.
रुग्णालये आणि शवागारांमध्ये मृत महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात अशा अनेक बातम्या आल्या आहेत. असे कृत्य करणारे लोक मानसिक लैंगिक विकाराने ग्रस्त असतात, असे या प्रकरणात मानले जाते. पण मृतदेहाची विशेषतः महिलेची प्रतिष्ठा राखण्यासाठी अशा कृत्यांना गुन्हा म्हणून वर्गीकृत केले पाहिजे, अशीही एक बाजू मांडली जात आहे. हे घृणास्पद कृत्य युनायटेड किंग्डम, कॅनडा, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत गुन्हा मानले जाते. या अनुषंगाने आयपीसीच्या कलम 377 मध्ये सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे.
कर्नाटकातील एका 21 वर्षीय तरुणाने प्रथम एका महिलेची हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. यानंतर आरोपीवर कनिष्ठ न्यायालयाने भादंविच्या कलम 302 अंतर्गत खून आणि भादंविच्या कलम 375 अंतर्गत बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप लावला.