दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला जात आहे. अपघात झाला तेव्हा कारचा वेग जवळपास ताशी 160 किमी होता. अपघातानंतर कार एक्स्प्रेस-वेवरुन खाली उतरली आणि जवळपास 150 मीटर दूर एका भिंतीवर जाऊन आदळली.
अपघातानंतर सर्वात आधी घटनास्थळी दाखल झालेल्या गस्त पथकाचे अधिकारी संतराम गुर्जर यांनी सांगितलं की, कारचा वेग ताशी 160 किमीपेक्षा जास्त होता. चालकाला झोप लागल्याने गाडी वेगात असतानाच रस्त्यावरुन खाली उतरली आणि 120 मीटर दूर जाऊन एका भिंतीवर आदळली. या अपघातानंतर पोलिसांनी चालकाशी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्याला झोप येत होती अशी माहिती दिली.
Disturbing CCTV Footage of Crash That Killed Manvendra Singh’s Wife#ManvendraSingh #ChitraSingh #Accident #CCTV #Alwar #Rajasthan pic.twitter.com/NnC77IIYcP
— Shivraj Yadav | शिवराज यादव (@shiva_shivraj) January 31, 2024
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मानवेंद्र सिंह यांचा चालक कार चालवत होता. पुढच्या सीटवर त्यांचा मुलगा बसला होता. मानवेंद्र सिंह पत्नीसह मागच्या सीटवर बसले होते. अपघातानंतर पुढील एअरबॅग उघडल्या, पण इतर उघडल्या नाहीत. यामुळे चालक आणि मुलगा सुरक्षित राहिले. पण मानवेंद्र सिंह आणि पत्नी दरवाजा आणि छतावर आदळले. यामुळे चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. तर मानवेंद्र सिंह यांच्या हाताचं आणि बरगड्यांचं हाड मोडलं आहे.
आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा सर्व लोक गाडीच्या बाहेर उभे होते. एक्स्प्रेस-वेवर कॉरिडोअर तयार करुन सर्वांना रुग्णालयात नेण्यात आलं अशी माहिती दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे मेंटनन्स मॅनेजर शंकर सिंह यांनी दिली आहे.
एक्स्प्रेस-वेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, "गाडीत बसलेल्या सर्वांना झोप आली होती. यावेळी चालकाला अचानक झोप आली. गाडीवरील ताबा सुटताच चालकाने कार कच्च्या रस्त्यावर उतरवली. पण यावेळी कारमधील दोनच एअरबॅग उघडल्या".
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे-वर वाहनांची वेगमर्यादा दर्शवणारे स्पीडोमीटर खराब झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन गाडीचा वेग किती होता याची विचारणा केली असता त्यांनी एक्स्प्रेसवे-वरील वेगाची माहिती देणारी मशीन खराब असल्याचं सांगितलं.
मानवेंद्र सिंह आपला मुलगा आणि पत्नीसद दिल्लीवरुन जयपूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. सध्या मानवेंद्र सिंह आणि त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.