तब्बल 8 किमीपर्यंत चुकीच्या दिशेने धावत होती स्कूल बस; CCTV त अपघात कैद; कटरने कापून काढावे लागले मृतदेह

Delhi Accident: दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर (Delhi Meerut Expressway) गाजियाबाद (Ghaziabad) येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना झाली. येथे विजय चौकाजवळ एक कार आणि स्कूल बसमध्ये धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. कारमध्ये असणाऱ्या सहाही लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 वर्षाच्या एका मुलासह दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

Updated: Jul 11, 2023, 01:19 PM IST
तब्बल 8 किमीपर्यंत चुकीच्या दिशेने धावत होती स्कूल बस; CCTV त अपघात कैद; कटरने कापून काढावे लागले मृतदेह title=

Delhi Accident: दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर (Delhi Meerut Expressway) गाजियाबाद (Ghaziabad) येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना झाली. बसचालकाची एक चूक आणि प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे एका कुटुंबातील 6 जण ठार झाले आहेत. मेरठमधील राहणारं एक कुटुंब राजस्थानच्या खाटू श्याम येथील मंदिरात दर्शनासाठी जात होतं. पण गाजियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवर झालेल्या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला. कुटुंबातील दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये एक लहान मूलही आहे. हा सर्व अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

विजय चौकाजवळ एक कार आणि स्कूल बसमध्ये धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. कारमध्ये असणाऱ्या 6 लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 वर्षाच्या एका मुलासह दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातनंतर कारचा दरवाजा कटरने कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. 

8 किमीपर्यंत चुकीच्या दिशेने जात असतानाही रोखलं का नाही?

या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. या सीसीटीव्हीत बस चुकीच्या दिशेने धावत असल्याचं दिसत आहे. तर कार मेरठच्या दिशेने येत होती. त्याचवेळी दोघांमध्ये धडक होते. मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाने सीएनजी भरल्यानंतर काही अंतर वाचवण्यासाठी तब्बल 8 किमी चुकीच्या दिशेने बस चालवली. दरम्यान, दिल्ली-मेरठसारख्या महत्त्वाच्या आणि इतक्य व्यग्र महामार्गावर बसचालक चुकीच्या दिशेना बस चालवत असताना त्याला थांबवण्यात का आलं नाही? अशी विचारणा केली जात आहे. तसंच बसचालक तब्बल 8 किमीपर्यंत चुकीच्या दिशेने जात असताना पोलिसांनाही दिसलं नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

बसचालक अटकेत

साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 6 ते 7 च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या अपघाताची माहिती घेत आहे. दरम्यान, जेव्हा अपघात झाला तेव्हा संपूर्ण बस रिकामी होती अशी माहिती आहे. 

गाजियाबादचे पोलीस उपायुक्त देहात शुभम पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "8 पैकी 6 जण ठार झाले असून दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाला अटक करण्यात आलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे. तसंच त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे". 

 

अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच जखमींच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्याचा आदेश दिला आहे.