नवी दिल्ली : सीडीएस अर्थात देशातील तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला बुधवारी भीषण अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी होती, की त्याची दृश्य सर्वांचाच थरकाप उडवून गेली.
अनेकांनीच जनरल रावत यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. जनरल रावत यांची आतापर्यंतची कारकिर्द आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांचं योगदान पाहता ही व्यक्ती असामान्य असल्याचं लक्षात येत आहे.
16 मार्च, 1958 मध्ये उत्तराखंडमधील पौडी येथे जनरल रावत यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील लक्ष्मणसिंह रावत हेसुद्धा सैन्यात सेवेत होते. लेफ्टनंट जनरल पदावरून ते निवृत्त झाले होते.
बालपणापासूनच सैन्यासाठी पूरक वातावरणात जनरल रावत यांचं संगोपन झालं होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण सेंट एडवर्ड स्कूल, शिमला येथे झालं होतं.
शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी उर्वरित शिक्षण इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून येथून घेतलं होतं. त्या ठिकाणी त्यांची कामगिरी पाहता मानाच्या Sword of Honour नं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
शिक्षणासाठी पुढे जनरल रावत यांनी अमेरिकेची वाट धरली. इथं त्यांनी सर्विस स्टाफ कॉलेजमधून पदवी शिक्षण घेत हायकमांड कोर्सही केला होता.
परदेशातून भारतात परतल्यानंतरच त्यांनी देशसेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 मध्ये यश प्राप्त झालं.
मोठा अपघात! पाहा CDS बिपीन रावत यांच्या Helicopter Crash चा भीतीदायक व्हिडीओ
11 गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियमध्ये ते सहभागी झाले आणि तिथूनच त्यांचा प्रवास सुरु झाला होता. सैन्यदलाच्या सेवेत असताना त्यांनी Crops,GOC-C, SOUTHERN COMMAND, IMA DEHRADUN , MILLTERY OPREATIONS DIRECTORET मध्ये LOGISTICS STAFF OFFICER अशा अनेक पदांचा पदभार सांभाळला होता.
भारतीय सैन्यदलातून त्यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी राजीनामा देत एका नव्या जबाबदारीच्या दिशेनं पावलं उचलली. ते देशातील सर्वात पहिले सीडीएस अर्थात तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख ठरले.
देशाचे संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांचे प्रमुख सल्लागार म्हणून ते काम पाहत .
पर्वतीय युद्धांमध्ये बिपीन रावत यांचा हातखंड
उंच पर्वतशिखरांवर होणाऱ्या सैनिकी कारवायांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांना पायदळी तुडवण्यासाठी ते ओळखले जातात. काऊंटर इंसर्जेंसी विशेषज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे.
पूर्वोत्तर भारतामध्ये चीनला लागून असणाऱ्या एलएसीवर त्यांनी इंफेंट्री बटालियनला कमांड दिली. काश्मीरच्या खोऱ्यात ते राष्ट्रीय रायफल्स आणि इंफेंट्री विभागात कमांडींग ऑफिसर म्हणून सेवेत होते.
2008 मध्ये काँगो येथे युएन पीसकिपिंग ऑपरेशनमध्ये इंडियन ब्रिगेड चीफ हे पदही त्यांच्याकडे होतं. 37 वर्षांच्या लखलखत्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक सेना मेडल आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
संयुक्त राष्ट्रांसोबतही काम करताना त्यांनी दोन वेळा कमांडर कमेंडेशन हा पुरस्कार पटकावला होता.
तीक्ष्ण नजर आणि चाणाक्ष बुद्धी अशीच त्यांची आणखी एक ओळख. संरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी लिहिलेले अनेक लेख आजवर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी मिलिटरी स्ट्रॅटर्जी स्टडीजमधील संशोधन अभ्यासही पूर्ण केला आहे. 2011 मध्ये जनरल रावत यांना चौधरी चरण सिंह विद्यापीठातून पीएचडी ही मानद पदवी देण्यात आली होती.
CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; घटनास्थळाचे पहिले Photo व्हायरल
बिपीन रावत यांच्या पत्नी, मधुलिका या दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्र अभ्यासक्रमातील पदवीधारक आहेत. त्या एक समाजसेविका असल्याचंही कळलं. कॅन्सरग्रस्तांसाठी त्या काही महत्त्वाची कामं करण्यात कायम पुढाकार घेत होत्या.
आयुष्यातील 42 वर्ष सैन्यदलाच्या सेवेत वाहणाऱ्या आणि देशातील सैन्यदलाच्या सर्वोत्त पदावर असणाऱ्या जनरल रावत यांच्यापुढं सध्याच्या घडीला अनेक आव्हानं होती, त्यांनी ती लिलया पेलली होती.
देशसंरक्षणासाठीच कायम ते कार्यरत राहिले आणि त्यांच्या प्रयत्नांना आलेलं यशही साऱ्या देशानं पाहिलं. अशा जनरल राऊत यांना कडक सॅल्युट अखेरचा सॅल्युट!